अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग समुद्रात इतिहासाची साक्ष म्हणून उभा असलेल्या कुलाबा किल्यावर आज विजयादशमी सणाच्या मुहूर्तावर शिवभक्तांनी गोंडयाच्या फुलांचे तोरण बांधले आहे. कुलाबा किल्यावर असलेल्या तोफांचेही यथासांग पूजन केले आहे. कुलाबा कील्याला नव्याने बसविण्यात आलेल्या महा दरवाजाला ही यावेळी तोरण बांधण्यात आले आहे. किल्याच्या बुरुजावरुन गुलालाची उधळण शिवभक्तांनी केली. अलिबागमधील गडवाट प्रवास सह्याद्रीचा, स्वराज्याचे शिलेदार, मावळा प्रतिष्ठानच्या सदस्यामार्फ़त दरवर्षी विजयादशमीला कुलाबा किल्यावर तोरण बांधून आणि शस्त्र पूजन करून हा सण साजरा करतात. किल्याचा इतिहास नव्या पिढीला समजावा, किल्याचे जतन आणि संवर्धन व्हावे या उद्देशाने हे शिवभक्त एकत्रित येऊन आपले कार्य नेहमी करीत आहेत.
कुलाबा किल्ला हा सरखेल कान्होजी आंग्रे याच्या आरमाराचे प्रमुख ठिकाण होते. त्यामुळे कुलाबा किल्याला स्वतःचा असा इतिहास आहे. कुलाबा किल्ल्यातून सागरावर अधिराज्य सरखेल कान्होजी आंग्रे यांनी अबाधित ठेवले होते. काळानुरूप काही भागात कुलाबा किल्याची पडझड झाली आहे. असे असले तरी किल्याचे प्रवेशद्वार आजही मजबूत आहे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वार दरवाजा हा जीर्ण झाला असल्याने अनेक वर्ष महा दरवाजा नव्हता. यंदा पुरातन विभागाने महा दरवाजा आणि यशवंत दरवाजा हा नव्याने पूर्वीप्रमाणे उभारला आहे. त्यामुळे किल्ल्याला शोभा आली आहे.
कुलाबा किल्याच्या प्रवेशद्वारावर आज विजयादशमी सणाच्या दिवशी मावळा प्रतिष्ठान, गडवाट प्रवास सह्याद्रीचा, स्वराज्याचे शिलेदार सदस्य यांनी गोंडयाच्या फुलांचे तोरण लावले. किल्याच्या बुरुजावरही गोंडा फुलांचे तोरण बांधण्यात आले. महा दरवाजाही फुलांनी सजवला होता. विजयादशमीला शस्त्राचेही पूजन केले जात असल्याने आणि कुलाबा किल्यात आजही इतिहासाची साक्ष म्हणून असलेल्या तोफा बुरुजातून डोकावत आहे. या तोफांचेही पूजन शिवभक्त सदस्यांनी केले. त्यामुळे शिवभक्ताकडून दरवर्षी प्रमाणे किल्ल्यावर विजयादशमी साजरे करण्याचे व्रत आजही निरंतर सुरू आहे.