पुन्हा एकदा फडके नाट्यगृहात हाऊसफुल्लची पाटी झळकली !

मायबाप रसिकप्रेक्षक हेच आम्हा कलाकारांचे ऊर्जास्रोत- अशोक हांडे
। पनवेल । साहिल रेळेकर ।
जागतिक कोरोना महामारीच्या संकटामुळे मागील दिड वर्षात कलाकारांनी खूप सहन केले. कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे जवळपास दीड वर्षापासून कलाक्षेत्र पूर्णपणे ठप्प होते. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याने पुन्हा एकदा कलाकारांना रंगभूमीची सेवा करण्याचे भाग्य लाभले. आजवर कलाकारांना एक गैरसमज होता की, आमच्यामुळे प्रेक्षक येतात; परंतु आज उद्भवलेल्या या परिस्थतीमुळे ही जाणीव झाली की, प्रेक्षक येतात म्हणूनच कलाकार आहेत. कालावंताची कला जिवंत ठेवण्यासाठी मायबाप प्रेक्षकांचे आशीर्वाद अत्यंत गरजेचे आहेत, असे प्रतिपादन जेष्ठ निर्माता, दिग्दर्शक, गायक व निवेदक अशोक हांडे यांनी केले. ते पनवेल येथे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ‘मराठी बाणा’च्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
कोरोना विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्जन्य रोगाचा प्रबंध व नियंत्रण उपाय म्हणून पनवेल महानगरपालिका क्षेत्र तसेच संपूर्ण राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून नाट्यगृह संपूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. परंतु कोरोनाने राज्यातून काढता पाय घेतल्यानंतर २२ ऑक्टोबर २०२१ पासून नाट्यगृहे पुन्हा सुरु करण्यात आली. राज्यसरकारच्या परवानगीनंतर नाट्यमंदिरांचे दरवाजे खुले करण्यात आल्याने कलाकारांसह रसिक प्रेक्षकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. परंतु अद्यापही कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नसल्याने सशर्त शिथीलतेसह नाट्यगृहात प्रेक्षकांना आसनक्षमतेच्या ५०% परवानगी देण्यात आली आहे. परिणामी कलाकारांचे मानधन, प्रवास खर्च, जाहिरात, बॅकस्टेज कलाकारांचे मानधन आदी बाबींचा खर्च १००%; परंतु कार्यक्रमाचे बुकिंग मात्र ५०% यामुळे अद्यापही पूर्वीप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करणे निर्माते व आयोजकांना परवडण्यासारखे नाही.
२२ ऑक्टोबरपासून नाट्यगृहे खुली झाल्यानंतर पनवेलमधील फडके नाट्यगृहात पहिल्यांदाच मराठी बाणा या दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५०% आसन क्षमतेच्या मर्यादेचे पालन करीत व कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून पनवेलकर रसिकांनी हाऊसफुल्ल उपस्थितीत कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला. कोरोनाकाळात नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या लोकांना पुन्हा एकदा मनोरंजनाचा मनमुराद आस्वाद घेता आल्याने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर एकप्रकारे समाधान दिसुन आले. तर कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहता कलाकारांमध्ये देखील चैतन्य व उत्साहाचे वातावरण दिसून आले.
यावेळी मराठी बाणाकार अशोक हांडे यांनी कोरोनाकाळानंतर पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच कार्यक्रमाला हाऊसफुल्ल प्रतिसाद देणाऱ्या प्रेक्षकांचे शब्दसुमनांनी आभार मानले. तसेच यापुढेही कलाकारांना भरभरून दाद देण्यासाठी वारंवार नाट्यगृहात यावे व सर्व कार्यक्रमांना भरघोस प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही ‘मराठी बाणा’कार अशोक हांडे यांच्यावतीने करण्यात आले. यावेळी उपस्थित रसिक प्रेक्षकांनी मराठी बाणाचा महाकलाविष्कार नेत्रात साठवून घेतला आणि पनवेलमध्ये लवकरच पुन्हा एकदा कार्यक्रमाचे आयोजन करण्याची विनंती केली.

Exit mobile version