उपांत्य फेरीत जर्मनीकडून पराभव
| क्वालालम्पूर | वृत्तसंस्था |
कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या (21 वर्षांखालील) उपांत्य फेरीत भारतीय युवा संघाला जर्मनीकडून 1-4 असा दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा ज्युनियर हॉकी विश्वचषक जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले. मलेशिया येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत क-गटातून दुसऱ्या स्थानासह सर्वप्रथम आगेकूच केली होती. मग उपांत्यपूर्व लढतीत त्यांनी नेदरलँड्सवर 4-3 अशी मात केली. त्यामुळे या सामन्यात भारत जर्मनीला कडवी झुंज देईल, असे अपेक्षित होते. मात्र संपूर्ण लढतीत भारताने 12 पेनल्टी कॉर्नर्सवर गोल करण्याची संधी गमावली. याचा फटका अखेरीस संघाला बसला. सहा वेळच्या विजेत्या जर्मनीने मात्र मिळालेल्या दोन्ही पेनल्टी कॉर्नर्सचा पूरेपूर लाभ उचलत दोन्ही वेळेस गोल केले.
भारताकडून सुदीप चिरमाकोने 11व्या मिनिटाला एकमेव गोल केला. जर्मनासठी बेन हॅशने आठव्या व 30व्या मिनिटाला दोन, तर पॉल ग्लेंडर व फ्लोरीन स्पेर्लिंग यांनी अनुक्रमे 41 आणि 58व्या मिनिटाला एकेक गोल नोंदवून जर्मनीचा विजय साकारला. अंतिम फेरीत जर्मनीची शनिवारी फ्रान्सशी गाठ पडेल. फ्रान्सने दुसऱ्या उपांत्य सामन्यात स्पेनला 3-1 असे नमवले.
आता कांस्यपदकासाठी भारताची लढत
उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने भारतीय संघ आता कांस्यपदकासाठी भिडणार आहे. फ्रान्स व स्पेन यांच्यातील पराभूत संघासोबत भारताची गाठ पडेल. भारताने 2001 मध्ये (होबार्ट) व 2016 मध्ये (लखनौ) ज्युनियर हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद पटकाविले होते. याचबरोबर 1997 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या स्पर्धेत भारताला उपविजेतेपद मिळाले होते. दोन वर्षांपूर्वी भुवनेश्वरमध्ये झालेल्या स्पर्धेत भारताच्या ज्युनियर संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.