अवैध सावकारी प्रकरणी आरोपीला कोठडी; दोघे फरार

| पेण | प्रतिनिधी |

अवैध सावकारीला कंटाळून दिवच्या विजय म्हात्रे यांनी आत्महत्या केल्यानंतर वाशी विभागात एकच हाहाकार उडाला आहे. या प्रकरणी पोलिस यत्रंणेने तीन आरोपींपैकी भूषण म्हात्रे याला पकडले असून न्यायालयात हजर केले असता सोमवारी दि.21 पर्यंत पोलिसकोठडी दिली असून साजन पाटील व मयूर धांडे हे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. पोलिस कसून तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकरणाला जबाबदार असणार्‍यांवर तातडीने कारवाई केली जावी, अशी मागणी परिसरातून होऊ लागली आहे.

अवैध सावकारी करणार्‍या मयूर धांडेबाबत अनेक तक्रारी असून, त्याला राजकीय वरदहस्त असल्याने तो अशी कृत्ये करतो, अशी तक्रार आता अनेकजण उघडपणे करु लागले आहेत. दुसरा आरोपी साजन पाटील याच्या सोशल मिडियावरही अनेक राजकीय नेत्यांचे फोटो असल्याचे दिसत आहे. याचाच गैरफायदा घेऊन ही मंडळी अवैधरित्या सावकारी करीत असल्याची तक्रार अनेक त्रस्त नागरिक करु लागले आहेत.

विजय म्हात्रे यांच्या सुसाईट नोटमध्ये देखील मयूर धांडे अ‍ॅन्ड कंपनीचे नाव असल्याने मयूर धांडे, साजन पाटील हे अवैध व्याजी पैसे लावण्याचा धंदा करत हेही उघड होत आहे. साजन पाटील यांना वाचविण्यासाठी राजकीय दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. कारण साजनची आई चैत्राली पाटील ही राष्ट्रवादी कॉग्रेसची महिला अध्यक्ष आहे. तर साजन हा स्वत: राष्ट्रवादी कॉग्रेसचा विद्यार्थी शाखेचा अध्यक्ष आहे.

तर ठिय्या आंदोलन
सोमवार दि.21 पर्यंत गुन्हयातील प्रमूख आरोपी साजन पाटील व मयूर धांडे यांना पोलिसांनी अटक केली नाही तर विजय म्हात्रे याचा सर्व मित्रपरिवार वडखळ पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करणार आहेत. तरी पोलिसांनी आपली सर्व गुप्त यंत्रणा वापरून आरोपींना अटक करावे अन्यथा सोमवारी शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल.असा इशारा या मित्रपरिवाराने दिला आहे.

Exit mobile version