दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप

| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये एक लाख दोन हजार 854 गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. विधीवत पुजा करून मंगलमय वातावरण बाप्पाची मुर्ती विराजमान करण्यात आली. बुधवारी दीड दिवसाच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत तलाव, नदी, व समुद्रा 25 हजार 625 गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले.

जिल्ह्यामध्ये मंगळवारी 19 सप्टेंबरला घरोघरी बाप्पाचे आगमन झाले. जल्लोषात गणरायाचे स्वागत ठिकठिकाणी करण्यात आले.गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना दुपारपर्यंत झाल्यानंतर विधीवत पुजा, आरती करण्यात आले. बाप्पाचे आवडते नैवेद घरोघरी तयार करण्यात आले. घरातील तरुणांसह महिला वर्ग ज्येष्ठ मंडळींनी पारंपारिक पेहरावर करीत बाप्पाचे उत्साहात स्वागत केले. काही ठिकाणी भजन, काही ठिकाणी सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबवून बाप्पाचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्याची तयारी दुपारपासून शहरी भागासह ग्रामीण भागात करण्यात आली.

गावांमध्ये सायंकाळी पाच नंतर डोक्यावर गणेशमुर्ती घेत बेंजोच्या वाद्यांबरोबरच भजन करीत नदी, तलावांच्या किनाऱ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सामुहीक आरती झाल्यावर नदी व तलावांमध्ये गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी गावांतील तरुणांनी स्वयंसेवक म्हणून भुमिका बजावली. तसेच शहरी भागात काही ठिकाणी तलावांमध्ये तर काही ठिकाणी समुद्रामध्ये गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले. अलिबाग येथील समुद्रकिनारी गणेशमुर्ती विसर्जन करण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेने नियोजन केले होते. निर्माल्य कुठेही अस्ताव्यस्त पडू नये यासाठी निर्माल्य गोळा करण्यासाठी नियोजन केले होते. तसेच खोल समुद्रात गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यासाठी सुरक्षा रक्षकांची मदत घेण्यात आली होती.

गणेशमुर्तीचे विसर्जन करताना गर्दीचा फायदा घेत चोरी करऱ्यांवर पोलीस नजर ठेवून होते. जिल्ह्यामध्ये एकूण 25 हजार 625 गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 11 व घरगुती 25 हजार 614 गणेशमुर्तांचा समावेश होता. जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप देत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करण्यात आला.

Exit mobile version