हिरव्यागार नवी मुंबईसाठी एक नागरिक, एक वृक्ष!

महापालिकेची नवीन संकल्पना
। नवी मुंबई । वार्ताहर ।
जागतिक तापमानवाढीवर वृक्ष लागवड हा एक महत्त्वाचा पर्याय ठरल्याने नवी मुंबई पालिकेने शहरात आणि मोरबे परिसरात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा दोन लाख झाडे लावण्यात येणार असून पामबीच मार्गावरील ज्वेल थीफ परिसरात 80 हजार झाडे एप्रिल अखेपर्यंत मियावॉकी तंत्रज्ञानाने लावण्यात आलेली आहेत.
याशिवाय पुढील वर्षांपर्यंत एक नागरिक, एक वृक्ष ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नवी मुंबईची विद्यमान लोकसंख्या पंधरा लाख असल्याने पालिकेने 15 लाख वृक्ष लागवडीचे लक्ष ठेवले आहे.
महामुंबई क्षेत्रात मोठया प्रमाणात सुरू असलेले बांधकाम आणि शासकीय प्रकल्पामुळे तापमान वाढलेले असल्याचे पर्यावरण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. सिमेंटचे जंगल म्हणून हे शहर नावारूपास आले आहे. सिडकोने या शहरात 46 टक्के मोकळी जमीन राखीव ठेवली आहे, पण त्या तुलनेने वृक्ष लागवड झालेली नाही. त्यामुळे नवी मुंबईत केवळ आठ लाख झाडे असून यात विदेशी झाडांचे प्रमाण जास्त आहे.
त्यामुळे पालिकेने कोपरखैरणे येथील जुन्या क्षेपणभूमीवर मियावॉकी तंत्रज्ञानाने पाच हजार झाडांच्या लागवडीची जंगल तयार करण्याचा प्रयत्न केला असून ऐरोली येथील नक्षत्र उद्यानात अशा प्रकारे वृक्ष लागवड करण्यात आली आहे. याच तंत्रज्ञानाने पामबीच मार्गावर विकसित करण्यात आलेल्या ज्वेल थीफ निसर्ग क्षेत्रात 80 हजार झाडे गेली दोन महिने लावण्यात येत असून एप्रिलअखेर हे काम पूर्णत्वास आले आहे. देशी झाडांना प्राधान्य देणार्‍या या तंत्रज्ञानाने एक वर्षांत पंधरा फूट उंच झाडे होत असल्याचे आढळून आले आहे. पंधरा फूट उंच होणारे झाडे हे प्राणवायू निर्माण करण्यात सक्षम होत असल्याचे दिसून आले आहे. याच तंत्रज्ञानाने खालापूर तालुक्यातील पालिकेच्या मालकी मोरबे धरण परिसरात एक लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. याच परिसरात पालिका सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणार आहे. वृक्ष लागवडीसाठी हा परिसर विस्तीर्ण आणि पूरक आहे. नवी मुंबईत सध्या चार नागरिकांमागे तीन झाडे असे प्रमाण आहे. त्याऐवजी 2023 पर्यंत हे प्रमाण वाढवून एका नागरिकास एक झाड असे प्रमाण निर्माण करण्याचा प्रयत्न पालिकेने आतापासून सुरू केला आहे. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यासाठी पालिका क्षेत्रातील सर्व मोकळया जागांचा शोध घेण्याचे आदेश दिले असून पावसाळयाच्या सुरुवातीस जास्तीत जास्त झाडे लावली जाणार असून 15 लाख झाडांचे लक्ष ठेवण्यात आले आहे. केवळ वृक्षलागवड करून उपयोग होणार नाही. त्यासाठी प्रत्येक उद्यानात नागरिकांच्या नावे ही झाडे लावण्याची पध्दत सुरू केली जाणार असून तो नागरिक या झाडांची काळजी, संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी सोपविली जाणार आहे. या वृक्ष लागवड चळवळीत प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले असून शहराचे तापमान नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version