अलिबागमधील दुसरी घटना
। अलिबाग । प्रतिनिधी ।
कंपनीच्या ट्रेंडिंग अॅपमध्ये पैसे गुंतविण्यास भाग पाडून अलिबागमधील एका इसमाची एक कोटी सहा लाख 56 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे. नुकतीच अलिबागमधील महिलेची 40 लाखांची फसवणूक केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा एक कोटी रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. त्यामुळे ऑनलाईन फसवणुकीला पुन्हा ऊत आल्याचे दिसून येत आहे.
सायबर सेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला व फिर्यादी पुरूष यांची सोशल मीडियावर 15 जानेवारीला ओळख झाली. हळूहळू दोघांचे मैत्रीत रुपांतर झाले. त्याचा विश्वास संपादन करुन त्या महिलेने त्याला आरटीजीसी कंपनीच्या ट्रेंडिंग अॅपमध्ये एक कोटी सहा लाख 56 हजार 96 रुपये गुंतविण्यास सांगितले. तिच्यावर विश्वास ठेवून त्याने ती रक्कम अॅपमध्ये भरली. त्यानंतर महिलेने त्याच्याशी संपर्क तोडला. त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्या इसमाने पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेल विभागात तक्रार केली. याबाबत पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडेकर अधिक तपास करीत आहे.