एकदिवसीय करंडक साखळी क्रिकेट स्पर्धा

महाराष्ट्राचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

| पुणे | वार्ताहर |

तिरुअनंतपुरम, केरळ येथे झालेल्या वरिष्ठ महिला गटाच्या एकदिवसीय करंडक साखळी क्रिकेट स्पर्धेत कर्णधार देविका वैद्य आणि तेजल हसबनीसने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने जम्मू-काश्मीर संघाचा 145 धावांनी पराभव केला. एलिट गटातून महाराष्ट्राने पाच विजयासह 20 गुणांसह बाद फेरी गाठली. त्यांची आता त्रिपुराशी उपांत्यपूर्व फेरीत बडोद्यात 22 जानेवारीला लढत होईल.

स्पोर्ट्स हब आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या या सामन्यात जम्मू-काश्मीर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय जम्मू-काश्मीर संघाच्या पथ्यावर पडला नाही. महाराष्ट्राने पाच बाद 290 धावा केल्या. यात देविका वैद्य, तेजल हसबनीस, अनुजा पाटील यांचा मोलाचा वाटा होता. देविका-तेजल या जोडीने चौथ्या विकेटसाठी 107 चेंडूंत 108 धावांची, तर देविकाने-अनुजाच्या साथीत पाचव्या विकेटकरिता 67 चेंडूत 78 धावांची भागीदारी रचली. देविकाचे शतक मात्र अवघ्या दोन धावांनी हुकले. देविकाने 85 चेंडूत तेरा चौकारांसह 98 धावांची खेळी केली. तेजलने 88 चेंडूत बारा चौकारांसह 77 धावांची, तर अनुजाने 47 चेंडूत चार चौकारांसह नाबाद 47 धावांची खेळी केली. प्रत्युत्तर देताना जम्मू-काश्मीर संघाला निर्धारित 50 षटकांत 4 बाद 145 धावाच करता आल्या. त्यात चित्रासिंह जामवालने 96 चेंडूत सात चौकारांसह 59 धावांची खेळी केली.

धावफलक महाराष्ट्र - (50 षटकांत) 5 बाद 290 (देविका वैद्य 98, तेजल हसबनीस 77, अनुजा पाटील नाबाद 47, सरला देवी 2-40, संध्या 2-57) विजयी विरुद्ध जम्मू-काश्मीर - (50 षटकांत) 4 बाद 145 (चित्रासिंह जामवाल 59, शिवांती गुप्ता नाबाद 32, ए. एन. तोमर 40, खुशी मुल्ला 1-16, आरती केदार 1-16, देविका वैद्य 1-21)
Exit mobile version