चार जण जखमी
। कोलाड । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील पुगाव ते ऐनवहाळ या मार्गांवर रेती वाहून नेणारा ट्रक पलटी झाला. या अपघातात रेतीच्या गोणी अंगावर पडल्याने एका हमालाचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले आहेत.
पुगाव ते ऐनवहाळ मार्गावरून ट्रकचालक आपल्या ताब्यातील ट्रक (क्र.एम. एच.42 ऐ. क्यू.1625) मधून रेती वाहून नेत होता. यावेळी माल खाली करणारे हमाल जितु उर्फ मोदी प्रेमजीत मखवाना, संतोष शांताराम कोकाटे, प्रफूल गजानन मगर, ज्ञानेश्वर मोरू साळवी, संजय विठोबा चोरगे हेदेखील त्या ट्रकमध्ये बसून जात होते. दरम्यान ऐनवहाळ गावाच्या हद्दीत आले असता चालकाने हलगर्जीपणाने ट्रक उजव्या साईडला नेला. मात्र, तेथील कच्च्या रोडवर टायर गेल्याने ट्रक चिखलात रुतला आणि पलटी झाला. यावेळी ट्रकमध्ये बसलेले हमाल खाली पडून त्यांच्या अंगावर रेतीच्या गोणी पडल्या. यात मोदी प्रेमजीत मखवाना याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चार जण जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते तात्काळ घटनास्थळी हजर झाले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस उपनिरीक्षक कदम अधिक तपास करीत आहेत.






