| सुधागड-पाली | वार्ताहर |
पाली-खोपोली राज्य महामार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे. सोमवारी (दि.15) एकाच दिवसात या मार्गावर भालगुल, वर्हाड व नानोसे या ठिकाणी तीन अपघात झाले आहेत. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर इतर जण गंभीर जखमी आहेत. वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गाचे नुकतेच रुंदीकरण पूर्ण झालेले आहे. त्यामुळे भरधाव वेगाने वाहने जात असतात. या मार्गावर वर्हाड गावच्या हद्दीत सायंकाळच्या सुमारास पालीकडून परळीकडे जाणार्या एका मोटरसायकलस्वाराने खोपोली बाजूकडून जाणार्या कारला धडक दिली. या अपघातात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे.
नानोसे गावाच्या हद्दीत नायरा पेट्रोलपंप जवळ एका मोटारसायकलस्वाराने रिक्षाला ओव्हरटेक करतांना विरुद्ध बाजूने जात खोपोली बाजूकडून जाणार्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला आहे. तर दुसर्या मोटरसायकलवरील मोटर सायकलस्वार व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या अपघातामुळे रिक्षादेखील कलंडली आणि रिक्षातील प्रवासी जखमी झाले आहेत. तर भालगुल येथे पालीकडून खोपोलीकडे जाणार्या कारला मोटरसायकलने धडक दिली. या अपघातात मोटरसायकलस्वार व त्याची पत्नी जखमी झाली आहेत.