| हैदराबाद | वृत्तसंस्था |
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांच्या स्वागतला आलेल्या गर्दीत एका 70 वर्षीय वृद्धाचा कारखाली चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जगनमोहन रेड्डी शनिवारी (दि.21) सत्तेनपल्ली येथे एका कार्यक्रमासाठी आले असता, त्यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांनी व चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी, त्यांच्या कारच्या ताफ्यासमोरच कार्यकर्त्यांनी धाव घेतल्याने सुरक्षा यंत्रणेला देखील ही गर्दी नियंत्रित करता आली नाही. त्यामुळे, जगमोहन रेड्डी ज्या कारमधून तिथं पोहोचले, त्याच कारच्या चाकाखाली एका 53 वर्षीय व्यक्तीचा चिरडून मृत्यू झाला आहे. चिल्ली सिंगा असं मृत व्यक्तीचे नाव असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जगमोहन रेड्डी यांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या कारकडे धाव घेतली. हातात बॅनर आणि फुलांच्या माळा घेऊन कार्यकर्ते त्यांच्या कारच्या दिशेने धावले. यावेळी, चिल्ली सिंगा हेही कारच्या दिशेने धावत असताना कारखाली आल्याने त्यांची मान कारच्या चाकाखाली दबली गेली. या दुर्घटनेत चिल्ली सिंगा यांचा जागीच मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. दरम्यान, घटनास्थळी गुंटूरचे एसपी आणि मोठा पोलीस ताफा पोहोचला. मात्र, माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील सुरक्षा यंत्रणेवर बोट ठेवलं जात आहे.







