अनेकजण जखमी
। पालघर । प्रतिनिधी ।
नाशिक-डहाणू राज्यमार्गावर मोखाडाजवळील तोरंगण घाटात टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर 30 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर विविध शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जव्हार मोखाडा तालुक्यातील अनेक मजूर दररोज नाशिक परिसरात रोजगारासाठी ये-जा करतात. मात्र एसटीचे भाडे परवडत नसल्यामुळे हे मजूर खाजगी वाहनातून दाटीवाटीने धोकादायकरित्या प्रवास करतात. असेच काही मजूर नाशिक परिसरात मजुरीसाठी गेले होते. मात्र कामगार परतत असताना हा भीषण अपघात घडला.
मोखाडा हद्दीत असलेल्या तोरंगण घाटातील उतारावर गुरुवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास ब्रेक फेल होऊन होऊन टेम्पो उलटला. अपघातामध्ये सुभाष दिवे (28) रा. हाडे ता. जव्हार या मजुराचा मृत्यू झाला, तर 30 पेक्षा अधिक मजूर जखमी झाले आहेत. टेम्पोला अपघात झाल्याचे समजतात मोखाडा येथील पोलीस कर्मचारी, शासकीय यंत्रणा आणि परिसरातील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी तातडीने अपघात स्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले.
जखमींपैकी पाच जणांना नाशिक येथील शासकीय रुग्णालय, सात जणांना त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालय तर इतर जखमींना मोखाडा ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकांमधून उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर काही जणांनी अपघातप्रसंगी टेम्पो बाहेर उड्या मारल्या. त्यामुळे अनेकांना दुखापत झाली आहे.






