चैत्रामध्येच वैशाखवणवा जाणवण्याच्या सध्याच्या काळात पावसाच्या नुसत्या कल्पनेनंही कोणाला बरं वाटेल. हवामान खात्यानं असा दिलासा आपल्याला दिला आहे. यंदा देशात सर्वसाधारण पाऊस पडेल असा अंदाज आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर सरासरीइतका वा त्याहून अधिकच पाऊस होणार आहे. म्हणजे यंदाही काही भागात पुराच्या शक्यता गृहित धरायला हव्यात. एकेकाळी हवामानाच्या अंदाजांची बरीच टिंगल केली जात असे. हवामान विभागाने पाऊस पडेल असे भाकित केले की छत्री घेऊन जाण्याची गरज नाही असे म्हटले जाई. आता मात्र स्थिती बदलली आहे. आता पावसाबाबत पुढच्या काही तासांचे आणि अगदी एखाद्या तालुक्याइतक्या प्रदेशाचे देखील भाकित करता येणे शक्य झाले आहे. विविध भागातील शेतकरी त्याचा उपयोगही करून घेत आहेत. विशेषतः अवकाळी पाऊस व गारपीट याबाबतची हवामान खात्याची भाकिते बर्याच प्रमाणात अचूक येऊ लागली आहेत. हे सर्व होण्यामागे आपल्या देशातील वैज्ञानिक, राज्यकर्ते, विविध संस्था यांचे परिश्रम आहेत. स्वातंत्र्यानंतर आपण आपला स्वतःचे उपग्रह आकाशात सोडण्याचा जो कार्यक्रम आखला त्याची ही फळे आहेत. भारत देशात जो एकूण पाऊस होतो त्यापैकी 75 टक्के हा नैऋत्य मान्सूस असतो. हा पाऊस हवामानातील असंख्य बारीकसारीक घटकांवर अवलंबून असतो. वार्याची दिशा काही अंशांनी बदलली तरी पावसाचे प्रमाण बदलू शकते. याबाबतचे तत्व बटरफ्लाय इफेक्ट म्हणून प्रसिद्ध आहे. भारताच्या किनार्यावर वावटळ उठण्याला दूर दक्षिण अमेरिकेच्या जंगलातील फुलपाखराने पंख फडफडवणे हे देखील एक कारण असू शकते असा हा तर्क आहे. त्याचा अर्थ इतकाच की पाऊस असंख्य गुंतागुंतीच्या प्रक्रियानंतर आकाराला येतो. यातल्या ला निना व एल निनो या दोन घटकांशी आता आपला चांगला परिचय झाला आहे. यंदा प्रशांत महासागरात ला निना ही स्थिती राहणार असल्याने पावसाची शक्यता अधिक व दुष्काळाची संभाव्यता कमी आहे. आता संगणकामुळे या सर्व प्रक्रियांची गणिते काही सेकंदात करणे शक्य होत आहे. त्यामुळेच हवामान अंदाजात सुधारणा झाली आहे. भारतीय हवामान खाते एप्रिल आणि जून अशा दोन टप्प्यात अंदाज देते त्याचे कारणही तेच आहे. एप्रिलमध्ये उपलब्ध असलेला डेटा किंवा माहिती जूनपर्यंत कितीतरी बदलण्याची शक्यता असते. गुरुवारी जो पहिला अंदाज आला आहे त्यानुसार यंदाचा पाऊस ठीक असला तरी देशाची पावसाची सरासरी गेल्या काही काळात घटत असल्याचेही निष्पन्न होते आहे. 2005 ते 2010 या काळात ती 89 सेंटीमीटर होती. 2018 ते 21 या दरम्यान ती 88 सेंटीमीटर झाली. तर आता ती 87 सेंटीमीटरवर आणण्यात आली आहे. यंदा या 87 सेंटीमीटरच्या सुमारे 99 टक्के पाऊस होईल असा अंदाज आहे. ही माहिती जमवण्यात किती सुधारणा झाली आहे हेही पाहण्यासारखे आहे. 2002 पर्यंत देशातील 523 जिल्ह्यांमध्ये असलेल्या 1963 पर्जन्यमापकांद्वारे पाऊसमानाच्या नोंदी घेतल्या जात. आता ही संख्या दुपटीहून झाली असून देशातील 703 जिल्ह्यांमधील 4132 मापकांद्वारे ही माहिती गोळा होत असते. अर्थात तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी सुधारणांना वाव असतोच. अलिकडे एखाद्या भागात ढगफुटी होऊन केवळ एका तासात दोन महिन्यांचा पाऊस पडल्याच्या घटना वारंवार घडतात. यांना अतिरेकी हवामान घटिते असे म्हणतात. याचनुसार उष्णतेच्या लाटा येणे हेही घडते. मुंबई परिसरात कधीही 36-37 अंश सेल्सिअसच्या वर तापमान जात नाही. यंदा काही भागांमध्ये ते 42-43 नोंदले गेले. या प्रकारांचा छडा लावणे व अचूक भाकित करणे अजूनही शास्त्रज्ञांना साधलेले नाही. भावी काळात तेही साधेल अशी अपेक्षा करूया. देशातील 78 टक्के शेती पावसावर अवलंबून आहे. या शेतीतील पिकांवर आपली अर्थव्यवस्था अवलंबून आहे. यंदा आपण अन्नधान्याची मोठी निर्यात केली. शिवाय पंतप्रधान गरीब कल्याणसारख्या योजनाही देशातील शेती उत्पादनांच्या आधारेच राबवल्या जाऊ शकतात. त्यामुळे तूर्तास तरी यंदाच्या ‘सर्वसाधारण’ पावसाच्या अंदाजाचा आनंद साजरा करायला हरकत नाही.
एक चांगली बातमी

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
by
Sanika Mhatre
March 8, 2026