श्रीवर्धनमधील नवी पेठ येथील घटनेने सर्वत्र खळबळ
| श्रीवर्धन | वार्ताहर |
जमिनीच्या वादातून आपल्या सख्ख्या चुलत्यालाच जीवे ठार मारण्याची घटना श्रीवर्धन शहरातील नवी पेठ या परिसरामध्ये घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मयत विनोद उर्फ बबन दत्तात्रेय पुसाळकर हे श्रीवर्धन येथील नवी पेठेत राहात होते. तर, त्यांचा पुतण्या नितीन गजानन पुसाळकर हादेखील त्या ठिकाणीच राहात होता.
मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून दोघांमध्ये जमिनीच्या कारणावरून सतत वादविवाद होत असत. शुक्रवारी सायंकाळीदेखील यांच्यामध्ये वाद झाला व त्याचे रूपांतर मारहाणीमध्ये झाले. आरोपींनी मयत इसमाला हनुवटीवर, भुवईवर धारदार शस्त्राने वार करून जिवे ठार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मयत व्यक्तीचे भाचे नंदकुमार गोविंद पाटील, रा. बोर्ली पंचतन यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केल्यानंतर पोलीस हवालदार दयानंद सरकटे यांनी फिर्याद दाखल करून घेतली आहे. याप्रकरणी आरोपी नितीन गजानन पुसाळकर (60) व ओमकार नितीन पुसाळकर (27) दोघेही रा. नवी पेठ, श्रीवर्धन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास श्रीवर्धनचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक मुगळीकर व पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत काळे हे करीत आहेत.