पर्यटकांच्या कारने दुचाकीस्वाराला नेले दीड किलोमीटर फरफटत
। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे पर्यटकांची चार चाकी कार आणि दुचाकी यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. हा अपघात शनिवारी (दि.31) दुपारच्या सुमारास घडला. अपघात एवढा भयानक होता की, कारने दुचाकीस्वाराला जवळजवळ दीड ते दोन किलोमीटर फरपटत नेले. यात श्रीवर्धन तालुक्यातील करलास गावातील महंमद हनीफ अरजबेगी व त्यांची पत्नी सिमीन ही गंभीर जखमी झाली. तर मोहम्मद हनिफ अर्जबेगी यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातामुळे या ठिकाणाच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. दिघी सागरी पोलीस ठाण्यामध्ये लोकांनी एकच गर्दी केली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
