दोन जखमी; पाच जण अटकेत
| अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग समुद्रकिनार्यावर दारूची बाटली फोडल्याच्या वादातून पाच जणांनी दोघांवर दारूच्या बाटल्या आणि चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्परता दाखवीत पाच जणांना तासाभरात अटक केली आहे. या हल्ल्यात मृत्यू झालेला तरुण पेण तालुक्यातील गडब येथील असून त्याचे नाव मितेश जनार्दन पाटील असे आहे. तर जखमी झालेल्यांमध्ये फिर्यादी प्रथमेश पाटील आणि ओमकार भुकवार या दोघांचा समावेश आहे. याबाबतची फिर्याद प्रथमेश राजेश पाटील यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीनुसार ओमकार भूकवार, विशाल वंटे, प्रथमेश घोडेकर, राज जयगडकर, प्रमोद किशन साठविलकर या पाच जणांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेण तालुक्यातील गडब येथील मितेश पाटील हा त्याचा मित्र प्रथमेश पाटील याच्या सोबत गावातून सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अलिबाग-वरसोली येथील यात्रेमध्ये जाण्यासाठी निघाले. प्रथमेश पाटील यांच्या स्कूटरवरून सायंकाळी पावणे आठच्या सुमारास वरसोली येथील विठ्ठल यात्रेमध्ये ते दोघेजण आले आणि सव्वा तास यात्रेत फिरले. त्यानंतरमितेश पाटील व त्याचा साथीदार प्रथमेश पाटील हे यात्रेमधुन बाहेर येऊन अलिबाग एसटी स्थानकावर आले. तेथे त्यांनी बस स्थानकानजीक असलेल्या एका वाईन शॉपच्या दुकानातुन पिण्यासाठी एलपी स्ट्राँग बियरच्या दोन बॉटल घेतल्या. तेथे जवळच असलेल्या एका बिर्याणीच्या दुकानातुन दोन चिकन बिर्याणी विकत घेवुन दोघेजण अलिबाग समुद्र किनार्यावर आले. किनार्यावरील कमानीपासुन डाव्या बाजुकडील मैदानापलीकडे मेरीटाईम बोर्डाच्या ऑफीस शेजारी असलेल्या कट्ट्यावरती जावुन बसले होते.
त्याठिकाणी ओमकार भूकवार, विशाल वंटे, प्रथमेश घोडेकर, राज जयगडकर, प्रमोद साठविलकर हे पाच जण दारू पीत बसलेले होते. मितेश व त्याचा मित्र प्रथमेश पाटील यांनी बिर्याणी व बियर पिऊन झाल्यानंतर प्रथमेश याने हातातील रिकामी बियरची बाटली कट्ट्यावरून दगडावर सोडली. बाटली दगडावर आपटल्याने फुटली आणि तिचा आवाज झाला. त्यावेळी त्यांच्या शेजारी बसलेल्या पाच जणांपैकी ओमकार भूकवार हा मितेश आणि प्रथमेश यांच्या जवळ गेला आणि त्यांना शिवीगाळी करून इथे बाटली का फोडली असे हटकले. त्यावेळी मितेश पाटील याने शिवीगाळी का करतोस असे विचारले असता त्याला त्यांचा राग येऊन त्याने मितेश यास हाताबुक्क्याने मारहाण केली. झालेले भांडण सोडविण्यासाठी प्रथमेश गेला असता विशाल वंटे, प्रथमेश घोडेकर, राज जयगडकर, प्रमोद साठविलकर यांनी त्यांच्या हातातील बियरच्या बाटल्यांनी मितेश व प्रथमेश यांना मारहाण केली. मारहाण झाल्यानंतर मितेश प्रथमेश याच्या स्कुटरजवळ गेला असता त्यास ओमकार भुकवर याने पकडुन ठेवले व विशाल वंटे याने त्याच्याकडील चाकूने मितेशवर वार केले. यामुळे मितेश गंभीर जखमी झाला आणि त्याच्या शरीरातून रक्तस्त्राव झाला. मितेशला उपचारासाठी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे आणले असता उपचारादरम्यान मितेश पाटील याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी घोषित केले.