ट्रक उलटून एक ठार, तीन जखमी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाकडांची वाहतूक करणारा ट्रक उलटून यामध्ये एक ठार तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात वारे-कुरुंग या जंगल परिसरातील रस्त्यावर घडला. मोठमोठाल्या झाडांची लाकडे भरून भिवंडी दिशेला निघालेला ट्रक रस्त्याच्या वळणाच्या उतार्‍यावर आला असता ट्रकमधील लाकडे ड्रायव्हर केबिनवर आदळून विचित्र अपघात घडला. यामध्ये (42) वर्षीय नसीम हाजीअन्सार अन्सारी ही व्यक्ती मृत झाली आहे. दरम्यान, रात्रीच्या अंधारात अवैधरित्या झाडाची तस्करी करून वाहतूक केली जाते, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

मंगळवारी (दि.21) भिवंडी पडघा येथून तीन ते चार ट्रक हे कर्जत तालुक्यातील वारे कुरुंग या परिसरात आले होते. रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास हेच ट्रक तोडलेल्या झाडांच्या लाकडांची भरणी करून पुन्हा आपल्या भिवंडी पडघा या दिशेने निघाले होते. एका ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात आणि मोठी लाकडे भरलेली होती. दरम्यान, हा ट्रक रस्त्याच्या वळणावर असताना ट्रक मधील लाकडे ड्रायव्हर केबिनवर आदळली, यामध्ये ट्रक चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला खोल खड्ड्यात उलटला. यावेळी ट्रक मध्ये चालकासह किन्नर तर अन्य दोन जण असे मिळून चार जण होती. या अपघातात ट्रकचा केबिन तुटून यामध्ये नसीम हाजीअन्सार अन्सारी या किन्नरचा मृत्यू झाला. तर, चालकासह दोन जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमींना रुग्णवाहेकेतून प्रथम कळंब प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेले. तर अधिक उपचारासाठी पनवेल रुग्णालयात हलविण्यात आले होते.

Exit mobile version