| पनवेल | प्रतिनिधी |
वेबसाइटवरून ऑनलाइन ड्रेस मागवणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. पनवेलच्या करंजाडे भागात राहणाऱ्या या विवाहितेने ज्या ऑनलाइन साइटवरून ड्रेस खरेदी केले, त्या बोगस साइटवरील सायबरचोरांनी तिला फसवले. ड्रेस घेऊन निघालेल्या डिलीव्हरी बॉयचा अपघात झाल्याचे सांगून त्यांना पैसे परत पाठविण्याचा बहाणा करून या महिलेकडून 1 लाख 32 हजार रुपये उकळण्यात आले.
सदर महिला इन्स्टाग्रामवरील रिल्स बघत असताना, आयेशा क्रिएशनच्या पेजवर स्वस्तात कपडे विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे तिने पाहिले. जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर या महिलेने संपर्क साधला असता 3 हजार 600 रुपयांत शिलाईसह दोन ड्रेस मिळतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे या विवाहितेच्या पतीने ड्रेस खरेदी करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या स्कॅनरवर 3 हजार 600 रुपये पाठवून दिले. मात्र त्यांचे ड्रेस घेऊन निघालेल्या डिलीव्हरी बॉयचा अपघात झाल्याचा मेसेज पाठवून सायबर चोरांनी त्यांची रक्कम परत करण्याचा बहाणा केला. तसेच गुगल पेवर रिक्वेस्ट स्वीकारण्यास सांगितले. त्यानुसार या महिलेच्या पतीने ही रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्यांना पैसे तर आले नाहीच, उलट पतीच्या खात्यातून 93 हजार रुपये गेले. त्यानंतर आयेशा क्रिएशनचे मालक असल्याचे भासवून या महिलेशी संपर्क साधला. मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले. तसेच त्यांना आणखी 30 हजार, त्यानंतर आणखी 5,298 रुपये पाठविण्यास सांगून फसवले.







