आठ सरपंचांसह एक सदस्य बिनविरोध

| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आठ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य बिनविरोध झाले आहेत. लोहारे ग्रामपंचायतीमध्ये फक्त सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून, सरपंच पदासाठी थेट लढत होणार आहे. उर्वरित 8 ग्रामपंचायतींमध्ये काही सदस्यांच्या जागा रिक्त तर काही बिनविरोध जाहीर झाल्या असून, उर्वरित सरपंच आणि सदस्य पदाच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. उमरठ येथे सरपंचपदासह 1 सदस्यपद रिक्त तरीही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.

पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द, बोरघर, चांभारगणी बुद्रुक, दिविल, गोळेगणी, कालवली, कापडे खुर्द, कोतवाल बुद्रुक, कोतवाल खुर्द, धामणदिवी, लोहारे, ओंबळी, पैठण, पार्ले, परसुले आणि उमरठ या 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर त्यापैकी गोळेगणी, कापडे खुर्द, कोतवाल बुदु्रक, कोतवाल खुर्द, ओंबळी, पैठण, पार्ले व परसुले या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसह निवड बिनविरोध झाली आहे. या बिनविरोध जाहिर झालेल्या 8 ग्रामपंचायतींमध्ये पैठण, परसुले, उमरठ आणि पार्ले येथील सदस्यांच्या काही जागा रिक्त आहेत.

लोहारे ग्रामपंचायतीच्या 9 जागांची निवड बिनविरोध झाली असली सरपंच पदासाठी दोन अर्ज रिंगणात राहिल्याने निवडणुकीसाठी सर्व तीनही प्रभागात प्रचार केला जाण्याची चिन्हे दिसून येत आहेत. पोलादपूर तालुक्यातील लोहारे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावबैठक होऊन शिंदे गटाला उपसरपंचपद, ठाकरे गटाला अडीच वर्षे तर महाविकास आघाडीला अडीच वर्षे सरपंचपद देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, आता ग्रामस्थांच्या निर्णयानुसार सदस्यपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे तर सरपंचपदासाठी थेट लढत अटळ असल्याचे दिसून येत आहे.

पोलादपूर तहसिल कार्यालयातील निवासी नायब तहसिलदार घुमरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 ग्रामपंचायतींपैकी 8 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. या 16 ग्रामपंचायतींच्या 48 प्रभागांसाठी 116 सदस्यपदांसाठी 181 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले त्यातील केवळ एक अर्ज छाननीदरम्यान अवैध ठरला असून 180 शिल्लक उमेदवारी अर्जांपैकी 36 अर्ज मागे घेण्यात आल्याने आता 144 उमेदवारी अर्ज रिंगणात आहेत. सरपंच पदासाठी उमरठ ग्रामपंचायतीमध्ये एकही अर्ज प्राप्त झाला नसून हे पद रिक्त राहूनही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. भोगाव खुर्द येथे सर्वाधिक 4 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात आहेत तर बोरघर, चांभारगणी बुद्रुक, धामणदिवी, दिवील, कालवली व लोहारे या ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने थेट लढत होणार आहे. तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासह सदस्यपदांसाठी निवडणूक होणार असून सर्व 9 सदस्य बिनविरोध आलेल्या लोहारे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी थेट लढत होणार आहे.

Exit mobile version