कार पेटवली, 13 आरोपींवर गुन्हा
। माणगाव । प्रतिनिधी ।
गुरे चोरून नेत असताना मयत अनोळखी इसम व त्याच्या साथीदारांना संगनमताने जमाव जमवून बेदम मारहाण करून कार पेटवली. याप्रकरणी 13 आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना माणगाव तालुक्यातील रवाळजे गावाच्या धरणाच्या वरती शनिवार, दि.7 मे रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद पोलीस पाटील पाटणूस प्रदीप महिपत म्हामुणकर (50) रा. म्हसेवाडी, ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील आरोपी महेश सुतार, केतन कोदे (पूर्ण नाव माहीत नाही) दोन्ही रा. विळे, ता. माणगाव, सागर खानविलकर, रा. भाले, ता. माणगाव, संदीप कुरमे, शुभम धूपकर (पूर्ण नाव माहीत नाही) दोन्ही रा. निजामपूर, ता. माणगाव, संकेत सखाराम सुतार, रुपेश विलास सुतार, संतोष पडवळ (पूर्ण नाव माहीत नाही) तिन्ही रा. म्हसेवाडी, ता. माणगाव, नरेश जाधव (पूर्ण नाव माहीत नाही) रा. फणसीडांग आदिवासीवाडी, ता. माणगाव, सूरज बावधाने (पूर्ण नाव माहीत नाही) रा. विळे धनगरवाडी, ता. माणगाव, गणेश सुतार, सचिन अडुळकर (पूर्ण नाव माहीत नाही) दोन्ही रा. विळे, ता. माणगाव, करण श्रीपत म्हामुणकर रा. पाटणुस, ता. माणगाव यांनी संगनमत करून बेकायदेशीर जमाव जमवून मयत अनोळखी इसम व त्याच्या साथीदारास गुरे चोरून नेत असताना त्यांच्या ताब्यातील रिट्ज कार (क्र.एम. एच.02 बी.एम.3173) ही गाडी पेटवून त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने हाताबुक्क्यांनी व लाथांनी मारहाण करून अनोळखी इसमाच्या मरणास व अनोळखी इसम यांची गाडी पेटवून गाडीच्या नुकसानीस कारणीभूत ठरले.
या घटनेची माहिती समजताच माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. आस्वर, पोलीस उपनिरीक्षक कीर्तीकुमार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी सात आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना माणगाव न्यायालयाने सात दिवसांची 14 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सहा आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील हे करीत आहेत.