| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्याजवळील कोलेटी गावाच्या हद्दीतील मुंबई – गोवा महामार्गावर मोटार सायकल स्वार घसरून पडल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकल चालक अंश परशुराम कोष्टी (19) रा. महात्मा गांधी नगर, कोपरी ठाणे याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या समावेत मोटरसायकलच्या मागे बसलेला भरत शंकर जोशी (23) रा. महात्मा गांधी नगर, कोपरी ठाणे हा जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.23) दुपारी12.40 वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
या संदर्भात नागोठणे पोलीस ठाण्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, अंश व भरत हे दोघे होंडा पॅशन मोटारसायकलवरून ठाणे बाजूकडे जात असताना मोटारसायकल चालक अंश याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने, रस्त्याच्या साईड पट्टीवर असलेल्या घडीवरून मोटरसायकल घसरल्याने मोटार सायकल चालक अंश कोष्टी याच्या डोक्याला व शरीराला गंभीर इजा झाल्याने अंशचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेला भरत जोशी याला पनवेल येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे. ह्या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपासणी पोलीस करीत आहेत.