कुरकुंडी कोलटेंभी येथील घटना
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या माती उत्खननाविरोधात तक्रार केल्याप्रकरणी कुरकुंडी कोलटेंभी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. तक्रारीवरून त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून, ही घटना बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात उमेश पाटीलसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन पाटील यांच्या तक्रारीवरून मिळालेल्या माहितीनुसार, रायदे-कुरकुंडी कोलटेंभी येथील सचिन जगन्नाथ पाटील हे बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून शेतावरील घरी निघाले होते. त्यावेळी गावातील उमेश पाटील यांच्यासह काही मंडळींनी धावत येऊन जिवघेणा हल्ला केला. यातील काही महिलांनी सचिन पाटील यांच्या अंगावर मसाला फेकला. त्यानंतर काठ्यांनी उपट घालून जखमी केले. सचिन पाटील यांच्या घराच्या संरक्षक भिंतीजवळ येऊन शिवीगाळी व ठार मारण्याची धमकी दिली.
गेल्या अनेक महिन्यांपासून कुरकोंडी कोलटेंभी परिसरातील सचिन पाटील यांच्या मालकीच्या जागेतून बेकायदेशीररित्या माती उत्खनन केले जात आहे. याबाबत अनेक वेळा मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र, त्यांच्याकडून योग्य कारवाई करण्यात आली नाही. शासनाचे नियम धाब्यावर बसवून हा माती उत्खननाचा प्रकार होत आहे. महसूल प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने पोलीस, जिल्हा, कोकणस्तरावर तक्रारी करण्यात आल्या आहेत. बेकायदेशीररित्या माती उत्खननाबाबत करण्यात आलेल्या तक्रारी अर्जाचा राग धरून जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप सचिन पाटील यांनी केला आहे. त्यामुळे पोयनाड पोलीस काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.





