सूर्याची बॅट तळपली!

जेव्हा खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजाचे राज्य असते. खेळपट्टीला प्रचंड उसळी असते, हवेत दमटपणा असतो आणि वातावरणात थंडीचा तडाका. अशा खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज भेदक गोलंदाजीची आग ओकत असतात. भले भले संघ अशा वातावरणात होरपळले जातात. भारतीय संघाचेदेखील रविवारी पर्थच्या ‘ऑप्ट्स’ स्टेडियमवर असेच झाले. विराट कोहलीसह संपूर्ण संघ पाचोळ्यासारखा उडून गेला. मात्र, त्या वादळातही एक खेळाडू कणखरपणे खेळपट्टीवर उभा राहिला सूर्यकुमार यादव.

खेळपट्टीच्या दुसर्‍या टोकाकडून सातत्याने विकेट पडत होत्या. त्याचवेळी दुसर्‍या टोकाला सूर्यकुमारची बिनधास्त, बेधडक फलंदाजी सुरु होती. मैदानाच्या सभोवताली चौफेर फटक्यांची बरसात होत होती. जणू काही इतर फलंदाजांना चेंडू टाकणारे गोलंदाज वेगळे आहेत आणि सूर्यकुमारला गोलंदाजी करणारे वेगळे असे वाटावे. लुंगे एनगिडीच्या गोलंदाजीवर मारलेला सूर्याचा स्ट्रेट ड्राईव्ह इतका ‘परफेक्ट’ होता की बॅटचा चेंडूवर झालेला आघात आणि सीमारेषेवर चेंडूने ओलांडलेली जागा; एका ओळीत आखून घ्यावी. स्ट्रेट ड्राईव्ह किती सरळ असू शकतो याचे आयसीसीने ते मोजमाप म्हणून निश्‍चित करावे. भारताची ससेहोलपट करणारा लुंगे एनगिडी याच्या चौथ्या षटकात मारलेला सूर्याचा षटकार आजच्या दिवसातील फलंदाजीच्या चार डावांतील सर्वोत्तम षटकार होता. फक्त बॅटच्या एका झोक्याने, सूर्याने फ्लीक केलेला चेंडू 94 मीटर्सपर्यंत गेला. फिरकी गोलंदाज महाराज याचा चेंडू क्रीझपुढे सरसावत सरळ साईट स्क्रीनवर खेचला. आणि अनुभवी रबाडाचा उजव्या यष्टीवरील चेंडू आडव्या बॅटने एखाद्या टेनिसपटूप्रमाणे सरळ मारुन चौकार मिळविला, आणि आपल्याकडे मैदानाच्या सभोवताली, 360 अंशांत फटके मारण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले. 40 चेंडूंतील त्याच्या 68 धावांच्या खेळीने भारताला तीन अंकी धावसंख्या दाखवली. त्यामुळे धावफलकावर झुंज देण्याइतपत धावसंख्या लागू शकली.

सूर्याचा ‘फिअरलेस अ‍ॅप्रोच’ आणि फटक्यांमधील ताकदीची नजाकत आज वेस्ट इंडियन फलंदाजांची आठवण करुन देत होती. भारतीय धावफलकावरील फलंदाजांच्या एक अंकी धावा पाहिल्यानंतर सूर्याच्या 68 षटकांचे आणि कार्तिकसोबतच्या अर्धशतकी भागीदारीचे महत्त्व अधोरेखित होते. कारण, खराब खेळपट्टीवर भेदक गोलंदाजी खेळणारा एकतरी खेळाडू आपल्याकडे आहे. ऑस्ट्रेलियातील उसळत्या खेळपट्ट्यांवर सूर्याचा आधार आपल्याला आहे.

Exit mobile version