‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू
| खास प्रतिनिधी | रायगड |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला रायगड जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिला अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काही निवडक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक रुपया जमा करण्यात येत आहे.
महसूल पंधरवड्यांतर्गत पहिला दिवस माझी बहीण लाडकी बहीण योजनेसाठी होता. आज अखेरपर्यंत तीन लाख 45 हजार 734 पात्र महिलांनी अर्ज केले आहेत. पैकी जिल्ह्यात एक लाख 33 हजार अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
तालुका स्तरावर शिबिरे घेऊन पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. प्राप्त अर्जाची छाननी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात छाननी कक्ष स्थापन केलेला आहे. तीन शिफ्टमध्ये निर्धारित निकषानुसार अर्ज छाननी, अंतिम करण्याच्या कार्यपद्धतीनुसार काम सुरु आहे. उर्वरित ऑनलाईन प्राप्त अर्जावर तालुकानिहाय कार्यवाही सुरु आहे. नव्याने प्राप्त होणारे ऑफलाईन अर्ज ऑनलाईन करण्याचे काम गावपातळीवर सुरु असून, पात्र लाभार्थ्यांना लाभ मंजुरी करण्याबाबतही कार्यवाही सुरु आहे.
1 ऑगस्टपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी संकेतस्थळ (पोर्टल) सुरु करण्यात आले आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे. हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून, याबद्दल कुठलाही प्रक्रियेचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.