विनापरवाना पिस्तूलची स्टंटबाजी भोवली

| तळेगाव | प्रतिनिधी |

तळेगाव एमआयडीसीतील मिंडेवाडी शिवारात शनिवारी (दि.13) एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्री साडेसातच्या सुमारास विनापरवाना पिस्तूलाने स्टंटबाजी करत असताना सुटलेली गोळी लागून एक परप्रांतीय कामगार गंभीर जखमी झाला असल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दोन परप्रांतीय इसमांवर गुन्हा दाखल केला आहे. दोघांपैकी एकाची पोलीस कोठडीत रवानगी झाली असून, गोळी लागून एक गंभीर जखमी झालेला त्याचा मित्र रुग्णालयात उपचार घेत आहे.

तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक-2 मधील मिंडेवाडी शिवारातील एका खाजगी कंपनीतून कामावरुन घराकडे जात असताना एका आपल्या मित्राने रस्त्याकडे झुडपांत लपून ठेवलेली विनापरवाना पिस्तूल हातात घेऊन स्टंटबाजी सुरु केली. दरम्यान, ट्रिगर दाबला गेल्याने पिस्तुलातून सुटलेली गोळी मोबाईलवर बोलत चाललेल्या त्याच्या मित्राच्या पोटात लागून तो गंभीर जखमी झाला. घटनेची वाच्यता होऊन नये म्हणून सोबतच्या मित्रांसह त्यांनी राहत्या खोलीवर जाऊन नंतर जखमी मित्राला तळेगावला उपचारासाठी नेले. मात्र, गोळीबाराच्या आवाजाने परिसरात चर्चांना उधाण आल्याने एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर परिसरात सखोल माहिती घेऊन पोलिसांनी संशयित आरोपी मंजरिन रजिफ मिया याला ताब्यात घेतले. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पिस्तूलातून गोळीबार करुन आमची लूटमार केल्याचा बनाव करीत चुकीची माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरुवातीला आरोपी मंजरिनने केला. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी खाक्या दाखविताच आरोपीने रस्त्याकडेला गवतात लपवलेली पिस्तूल दाखवत घडलेल्या खऱ्या प्रकाराची कबुली दिली.

Exit mobile version