सालेगावात एक गाव एक गणपती

110 वर्षांची परंपरा

| माणगाव | वार्ताहर |

माणगाव तालुक्याच्या साले गावातील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने एक गाव एक गणपती ही संकल्पना गेली अनेक वर्षे राबविली आहे. ही परंपरा गेल्या 110 वर्षांपासून सुरू आहे. ग्रामस्थांनी आपल्या या कृतीतून एक वेगळे अनुकरणीय पाऊल टाकत सर्वापुढे आदर्शच उभा केला आहे. गणेशभक्तांच्या नवसाला पावणारा म्हणून या गणपतीची ओळख आहे. म्हणूनच दरवर्षी या गणपतीच्या दर्शनाला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगावपासून अवघ्या चार कि. मी. अंतरावर असलेले अत्यंत छोटे व निसर्गरम्य असे हे साले गाव आहे.

साले गावाच्या पश्चिमेला शिवगणेश मंदिर आहे. दरवर्षी गणेश चतुर्थीला भक्तगण या मंदिरात येतात. त्यानंतर गेल्यावर्षी गावाने बोललेला सामुहिक व वैयक्तिक असे नवस फेडले जातात. त्यानंतर पुन्हा नव्याने भक्त आपापले वैयक्तिक नवस बोलतात अशी प्रथा आहे. दुपारी एकनंतर सजविलेल्या पालखीतून प्राचीन असणारी ही गणेशाची मूर्ती मंदिरालगत असलेल्या शिवकालीन तलावातून छातीभर पाण्यातून शंखनाद व मोरयाच्या गजरात फिरविली जाते. तलावातून पालखी फिरवण्याची ही प्रथा गेल्या कित्येक वर्षापासूनची आहे. हा पालखीसोहळा सुद्धा अनेकांसाठी आकर्षणाचा भाग असतो. नंतर ही पालखी गावातूनही फिरविण्यात येते. त्यानंतर ही पालखी मंदिरात गेल्यानंतर आरती होऊन मूर्तीची पुन्हा स्थापना केली जाते. गावातील कोणत्याही घरात वैयक्तिकरित्या अथवा दुसऱ्या सार्वजनिक गणपतीची स्थापना कोणीही करीत नाही, असे केल्यास त्याच्या घरात अरिष्ट येते अशी तेथील ग्रामस्थांत समजूत आहे.

Exit mobile version