| पनवेल | वार्ताहर |
वाढत्या महागाईमुळे आता स्थानिक बाजारातील खाद्यपदार्थांचेही दर वाढल्याने बाजारात त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. जीवनावश्यक समजला जाणारा कांदा महागल्याने बाजारात सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरणाऱ्या कांदाभजीचे दर चांगलेच वधारले आहेत. हॉटेलमधील ताटातूनही कांदा गायब झाला आहे. त्यामुळे आपोआपच खवय्यांच्या खिशाला कात्री बसू लागली आहे.
शेतीमालाचे दर वाढल्यावर आपोआपच त्याचा बाजारातील उलाढालीवर परिणाम दिसतो. अलीकडे बाजारातील जीवनावश्यक समजला जाणारा कांदा महागला आहे. स्थानिक बाजारात सद्यःस्थितीत सुमारे 50 ते 60 रुपये प्रतिकिलोने कांदा विकला जात आहे. त्याचा आपोआपच परिणाम बाजारातील खाद्यपदार्थांवर झाल्याचे चित्र आहे. बाजारात सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आणि पसंतीस उतरणारी कांदाभजी मात्र महागली आहेत. त्यामुळे खवय्यांची मोठी पंचाईत झाली आहे.
हॉटेलमध्ये मुबलक खाद्यपदार्थांसोबत दिला जाणारा कांदाही आता मर्यादित दिला जात असून, वाढीव कांदा हवा असल्यास जादा पैसे मोजावे लागत आहेत. पर्यायाने सकाळचा नाश्ता महागल्याने सर्वसामान्यांना त्याचा त्रास होत आहे. बाजारातील कांद्याचे दर वाढल्याने अन्य खाद्यपदार्थांचे दरही वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना हॉटेलिंग परवडेनासे झाले आहे. एकूणच, जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्यावर त्याचा थेट परिणाम खवय्यांच्या खिशावर होत असल्याचे जाणवत आहे.