पालीतील शिक्षकाची ऑनलाईन फसवणूक
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
ऑनलाईन खरेदीत ग्राहकांची कशी फसवणूक होते याचा प्रत्यय पालीत आला आहे. पाली येथील जनार्दन भिलारे या पदवीधर शिक्षकांनी सोमवारी (दि. 9) फ्लिपकार्टवरून ऑनलाइन शॉपिंगवर सिलिंग फॅन मागवला होता. मात्र, या फॅनच्या खोक्यामध्ये चक्क विटा पाठवण्यात आल्या. यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला. कंपनीसोबत भांडून तक्रार केल्यानंतर त्यांना त्यांचे पैसे रिफंड करण्यात आले.
या फसवणूकी संदर्भातील व्हिडिओ जनार्दन भिलारे यांनी सोशल मीडियावर देखील पोस्ट केला आहे. जनार्दन भिलारे यांनी फ्लिपकार्टवर ऑनलाइन बजाज सिलिंग फॅन ऑर्डर केला. त्याप्रमाणे सोमवारी डिलिव्हरी प्राप्त झाली. खोका बजाज कंपनीच्या फॅनचा होता. मात्र, खोका उघडल्यावर फॅन ऐवजी त्यामध्ये चक्क विटांचे तीन तुकडे निघाले. त्यानंतर त्यांनी ऑनलाइन तक्रार केली. रात्री मोबाईलवर संपर्क केल्यानंतर कंपनीकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. अकाउंट नंबर मागून त्यावर दोन हजार चारशे तीस रुपये घेतलेली रक्कम त्याच रात्री 11.13 वाजता अकाउंटवर जमा करण्यात आली. मात्र, या सर्व खटापटीत ग्राहक म्हणून जो मानसिक त्रास झाला याला जबाबदार कोण? हा प्रश्न निर्माण होत आहे.
यापुढे ऑनलाईन खरेदी करायची की नाही हा माझ्याकडे प्रश्न निर्माण झाला आहे. ग्राहक म्हणून ऑनलाईन खरेदी करताना यापुढे सर्वांनी सावधगिरी बाळगावी. माझी फसवणूक झाली पैसे त्याच दिवशी माझ्या खात्यावर जमा झाले, मात्र ऑनलाईन तक्रार नोंदवणे, अपडेट घेणे यामध्ये वेळ वाया जातो. मानसिक त्रास होतो. मी कंपनी प्रतिनिधी यांना फोन करून यापुढे कोणत्याही ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी या संदर्भात सूचना केलेली आहे.
– जनार्दन भिलारे, पदवीधर आदर्श शिक्षक, पाली






