तरुणीची ऑनलाईन फसवणूक

| पनवेल | वार्ताहर |

कळंबोळी वसाहतीमध्ये राहणाऱ्या एका महिलेस बँकेतून बोलत असल्याचे भासवून एका महिलेने कळंबोळीत राहणाऱ्या तरुणीच्या क्रेडिट कार्डला लागलेला प्रोटेक्शन चार्ज रद्द करण्याच्या बहाण्याने तिच्याकडून संपूर्ण माहिती घेऊन तिच्या क्रेडिट कार्डमधून 48 हजारांची रक्कम काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला आहे.याप्रकरणात फसवणूक झालेली 22 वर्षीय तरुणी एका खासगी कंपनीत कामाला आहे. या तरुणीचे आयसीआयसीआय बँकेत खाते असून त्याच बँकेचे तिच्याकडे क्रेडिट कार्ड आहे.

गत महिन्यामध्ये एका अज्ञात महिलेने आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे भासवून या तरुणीशी संपर्क साधला होता. तसेच तिच्या क्रेडिट कार्डला प्रोटेक्शन चार्ज लागला असून तो रद्द करण्यासाठी फॉर्म भरावा लागेल, असे सांगितले होते. त्यासाठी या महिलेने या तरुणीच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली होती. तरुणीने सदर लिंक ओपन करून त्यात आपले नाव, गाव व बँक खात्याची संपूर्ण माहिती भरल्यानंतर या महिलेने या तरुणीच्या मोबाईलवर आलेला ओटीपी मागून घेतला. त्यानंतर काही वेळातच तरुणीच्या क्रेडिट कार्डमधून 48,623 इतकी रक्कम वजा झाल्याचे तरुणीच्या लक्षात आले. त्यानंतर तरुणीने या महिलेला संपर्क साधला असता, त्या महिलेने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने कळंबोली पोलीस ठाणे, तसेच बँकेत याबाबतची तक्रार दाखल केली.

Exit mobile version