| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा पोलीस ठाण्यात टेलिग्राम टास्कच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई तांत्रिक तपासाच्या आधारे करण्यात आली असून, आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.5 ते 7 ऑक्टोबर दरम्यान टेलिग्राम टास्कच्या नावाखाली म्हसळ्यातील राहुल वसंत यांची यूपीआय व आरटीजीएस द्वारे वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे जमा करून फसवणूक करण्यात आली होती. या गुन्ह्यात आरोपींनी एकूण 12 लाख 53 हजार 153 रुपयांची रक्कम लंपास केल्याचे तपासात निष्पन्न झाले. हा तपास रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक शिवथरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड श्रीवर्धन पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे म्हसळा पोलीस ठाणे यांनी केला. या गुन्हात एकूण 6 जणांचा समावेश असून त्यापैकी रोहीत संजय गमरे (40), रोशन आनंद सिंग (25), अंकीत विरेंद्र विश्वकर्मा (23) व वृषभ बबन जाधव (26) या चौघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित अनुज सिंग आणि जोरा राम या दोघांचा शोध सुरू आहे.







