रायगड पोलिसांचा धाक संपला?
। अलिबाग । प्रतिनिधी ।
ऑनलाईन चक्री जुगाराची पाळेमुळे शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील पोहोचली आहेत. या चक्री जुगारामुळे तरुण पिढी बरबाद होण्याची भीती असताना कुटुंबदेखील उद्ध्वस्त होण्याचा धोका वाढला आहे. तरीदेखील रायगड जिल्ह्यात अनेक भागांमध्ये ऑनलाईन चक्री जुगार तेजीत सुरु आहे. बेकायदेशीर धंदा चालिवणार्यांवर पोलिसांचा अंकुश राहिला नाही. त्यामुळे पोलिसांचा धाक आता संपण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.
रायगड जिल्ह्यात ऑनलाईन चक्री जुगाराने उच्छांद मांडला आहे. अलिबाग, पाली, रेवदंडा, नागोठणे, रोहा, मांडवा, पेण या भागात 40 हून अधिक ऑनलाईन चक्री जुगाराचे काऊंटर आहेत. अलिबाग शहरासह विद्यानगर तसेच अन्य तालुक्यात चक्री जुगारात तेजीत सुरु आहे. प्रत्येक काऊंटरच्या ठिकाणी चार संगणक लावून दिवसाला एका काऊंटर मागे 50 हजार ते एक लाख रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे या चाळीस काऊंटरमधून लाखो रुपयांचा उलाढाल होत असल्याचे बोलले जात आहे. इतर जुगाराचा निकाल संध्याकाळी व सकाळी लागतो. परंतु, ऑनलाईन चक्री जुगाराचा निकाल दर मिनिटाला लागतो. दहा रुपयांपासून 10 ते 20 हजार रुपयांपर्यंत पॉईंट मिळविल्यावर (रिचार्ज) त्यामागे वीस टक्के कमिशन घेतले जाते. या चक्री जुगारातून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होते. अधिक पैसे कमविण्याच्या नादात घरातील कर्ता पुरुष, तरुण मंडळी या जुगाराच्या नादात आपली रोजची कमाई घालवून कर्जबाजारी होण्याची भीती निर्माण झाली आहे.
अलिबागमधील विद्यानगर परिसरात चक्री जुगाराचे कार्यालय उभारण्यात आले आहे. या कार्यालयात पाच ते सहा संगणक असून, त्याद्वारे कारभार चालविला जात आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सुरू असलेल्या या जुगाराचे मुख्य सूत्र अलिबागमधून चालत असल्याची माहिती समोर येत आहे. मोलमजुरी करणार्या वर्गापासून काही सुटाबुटात असणारी मंडळी, तरुण पिढीदेखील या जुगाराच्या आहारी जात आहे.
जिल्ह्यातील अनेक भागात हा धंदा जोमाने सुरु आहे. मात्र, पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप तक्रारदारांकडून केला जात आहे. या धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. याकडे पोलीस गांभीर्याने लक्ष देतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मुख्यालयाच्या ठिकाणीच धंदे
अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस उपविभागीय अधिकारी व अलिबाग पोलीस ठाणे यांचे कार्यालय आहे. तरीदेखील मुख्यालयाच्या ठिकाणी खुलेआमपणे अवैध धंदे सुरु आहेत. मटका, गुटखा विक्रीसह ऑनलाईन चक्रीचा धंदा अलिबागमध्ये आजही राजरोपणे चालविला जात आहे.
मटका जुगाराला ऊत
अलिबाग तालुक्यातील अनेक भागात मटका जुगाराचा धंदा राजरोसपणे सुरु आहे. अलिबाग शहरासह पोयनाड, चोंढी, कुरूळ, वावे, आंदोशी, रेवदंडा या परिसरात मटका जुगार चालविला जात आहे. कल्याण, मेन नावाच्या या मटका जुगाराच्या आहारी जाणार्यांची संख्यादेखील प्रचंड वाढली आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांचा या धंद्यावर अंकुश न राहिल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.