ऑनलाईन कर्ज पडले महागात

| नविन पनवेल । वार्ताहर ।

तळोजा परिसरात ऑनलाईन कर्ज एका महिलेला महागात पडले आहे. या कर्जाची परतफेड करूनही पैसे उकळण्यासाठी एका अनोळखी व्यक्ती कडून फोटो मार्फ करून या महिलेला मानसिक त्रास देण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळोजा परिसरात रिअल इस्टेटचा व्यवसाय करणार्‍या एका महिलेने कमी व्याज दर आणि तत्काळ कर्ज उपलब्ध होत असल्याने एका अ‍ॅपवर फोटो, दस्तावेज आणि नातेवाईकांचे संपर्क क्रमांक देऊन तीन हजार सहाशे रुपयांचे कर्ज घेतले होते. सात दिवसांसाठी घेतलेल्या या कर्जाची ऑनलाईन परतफेडदेखील केली होती. तरी एका अनोळखी व्यक्तीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड झाली नसल्याचे सांगत वारंवार संपर्क केला जात होता. यावेळी पीडित महिलेने घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्याचे सांगून सर्व मोबाईल ब्लॉक केले; पण पुन्हा आठ दिवसांनी कर्जासाठी दिलेले फोटो मार्फ करून नातेवाईकांना पाठविण्यात आले. या प्रकाराने पीडित महिलेला मानसिक धक्का बसला असून या प्रकरणी तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाईन तसेच माहिती नसलेल्या कोणत्याही अ‍ॅपवर नागरिकांनी जाऊ नये. विनामूल्य आणि लालसेपोटी कर्ज घेण्याच्या प्रलोभनाला नागरिक बळी पडतात. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

जितेंद्र सोनावणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तळोजा
Exit mobile version