माथेरान शटलसाठी ऑनलाईन आरक्षणाची मागणी

| माथेरान | वृत्तसंस्था |

माथेरान पर्यटनस्थळाची अस्मिता समजली जाणारी माथेरानची राणी अर्थात मिनिट्रेन शटल सेवा सुरळीत सुरू असून विकेंडला सर्व फेर्‍या पर्यटकांनी पूर्ण क्षमतेने भरून जात आहेत. पर्यटक संख्या जास्त आणि शटलच्या फेर्‍या कमी यामुळे मिनिट्रेनसाठी येणारे हौशी पर्यटकांना मिनीट्रेनचा आनंद घेता येत नसल्याने त्यांचा पुरता हिरमोड होत आहे. शटल सेवेचे आरक्षण असते तर आमची माथेरान ट्रिप समाधानी झाली असती असे पर्यटकांचे म्हणणे असून आगामी काळात मिनीट्रेन शटल सेवेसाठी आरक्षण खिडकी सुरू करावी अशी मागणी पर्यटक प्रवाशांकडून होत आहे.

मुंबई-पुण्यापासून अगदी जवळ असल्याने माथेरान पर्यटनस्थळाकडे पर्यटकांचा कल वाढू लागला आहे. पर्यटकांचा राबता पाहता येथील अमन लॉज स्टेशन ते माथेरान स्टेशन दरम्यान शटल सेवेच्या अप व डाऊन मिळून दिवसातून सोळा फेर्‍या होत आहेत. उन्हाळी हंगामात येथे पर्यटक संख्या जास्त असल्यामुळे काही पर्यटकांना तिकीट न मिळाल्यामुळे मिनीट्रेनचा आनंद घेता आला नाही. त्यामुळे नाराज पर्यटकांनी ऑनलाइन आरक्षण सुरू करण्याची मागणी केली आहे. ऑनलाईन आरक्षणामुळे माथेरानचे पर्यटन आणखीन वाढेल असे पर्यटकांचे म्हणणे आहे. त्याच बरोबर येथील मुख्य पर्यटन हंगामावेळी शटल सेवेच्या फेर्‍यांमध्ये व डब्यांच्या संख्येत वाढ करावी अशी मागणीदेखील पर्यटक करीत आहेत.

माझ्या परिवारातील बच्चे कंपनीला मिनीट्रेनची सफर करायची होती. आम्ही सकाळी माथेरान गाठले. पण तिकिटासाठी खूप मोठी रांग होती. रांगेत उभे राहूनही आम्हाला तिकीट मिळाले नाही आणि मुले निराश झाली. या मिनीट्रेनचे आकर्षण लहान मुलांना जास्त असल्याने ते हट्ट धरून बसले पण नाईलाज झाल्याने आम्हाला माघारी फिरावे लागले. जर ऑनलाईन आरक्षण असते तर आम्ही ते आरक्षित करून मिनीट्रेनचा आनंद मुलांना नक्कीच दिला असता. मध्य रेल्वेने शटल सेवेची ऑनलाईन आरक्षण सेवा सुरू करावे, अशी आमची मागणी आहे.

राजन चक्रवर्ती, पर्यटक, मुंबई
Exit mobile version