अपात्रतेच्या निकालाला उरले अवघे 48 तास

आजारी असूनही नार्वेकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

। मुंबई । वृत्तसंस्था ।

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निकालास अवघे दोन दिवस उरले आहेत. अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रविवारी (दि.07) वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमागचे कारण उघड झाले नसल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

नार्वेकर हे आजारी असूनही रविवारी वर्षा बंगल्यावर दाखल झाले. नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांची भेट ठरलेली नव्हती. परंतु, अचानक त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी वर्षा बंगल्यावर केवळ मुख्यमंत्री आणि नार्वेकर हे दोघेच उपस्थित होते. अन्य कोणीही नेता यावेळी उपस्थित नव्हता. दोन्ही उपमुख्यमंत्रीही या बैठकीत नव्हते. त्यामुळे या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

सर्वोच्च न्यायायलाच्या निर्देशांनुसार शिवसेना आमदार अपात्रप्रकरणी नार्वेकर यांनी १० जानेवारीपर्यंत निर्णय देणे अपेक्षित आहे. मात्र, या निकालापूर्वीच नार्वेकर हे आजारी पडल्याने त्यावरून विरोधकांनी उलटसुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा अध्यक्षांचे आजारी पडणे हा संभाव्य राजकीय भूकंपाचा भाग असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. या पार्श्वभूमीवर नार्वेकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या जात आहेत.

Exit mobile version