| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड लोकसभा मतदार संघातील ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. आपल्या अस्तित्वाची ही लढाई असून, खारेपाटातून अनंत गीतेंनाच मताधिक्य मिळणार, असा विश्वास शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ हाशिवरे येथे मंगळवारी (दि.30) वैजाळी हाशिवरे ग्रामपंचायतीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी आ. जयंत पाटील बोलत होते.
यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, मुस्लीम मराठी समाजाचे अध्यक्ष सुभानअली खान, शेकाप युवा नेते सवाई पाटील, सरपंच शैला पाटील, ॲड. प्रथमेश पाटील, विजय पाटील, शिवसेनेच्या दर्शना पाटील आदी मान्यवरांसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील निवडणुकीत सुनील तटकरेंना आपण निवडून आणले. मात्र, त्यांनी आपल्याशी गद्दारी केली. शेकापला नष्ट करण्याची भाषा बोलणाऱ्या तटकरेंना या निवडणुकीतून जागा दाखवण्याची वेळ आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला जात आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी कामगार पक्षाबरोबरच शिवसेना तसेच काँग्रेसचे कार्यकर्तेदेखील हिरिरीने मतदारसंघात काम करीत आहेत. आपण सर्वजण एकत्र राहिलो तर राहुल गांधी पंतप्रधान नक्कीच होतील, असा विश्वास व्यक्त करीत आ. जयंत पाटील पुढे म्हणाले की, या निवडणुकीत अनंत गीते ऐतिहासिक मते घेऊन दिल्लीत जातील. खारेपाटातून विक्रमी मताधिक्य मिळेल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.