गीतेंनाच मिळणार सर्वसामान्यांचा कौल

शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील यांचा विश्‍वास

। अलिबाग । प्रतिनिधी ।

महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जनसंवादातून त्यांना मतदारांसह कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गीते यांच्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वसामान्यांचा कौल अनंत गीतेंनाच मिळणार असा विश्‍वास शेकाप अलिबाग तालुका चिटणीस अनिल पाटील यांनी विश्‍वास व्यक्त केला आहे.

आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांची काम करण्याची पध्दत खुप वेगळी असून समाजहित साधणारे व्यक्तीमत्व आहे. एक निष्ठावंत नेते म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या शिवसेनेसोबत, उध्दव ठाकरे यांच्या मागे कायमच उभे राहिले आहेत. केंद्रात अनेक वर्ष खासदार, मंत्री असल्याने त्यांना प्रशासनाचा दांडगा अभ्यास आहे. अलिबाग तालुक्यात अनेक भागांमध्ये अनंत गीते यांच्या जनसंवाद बैठका झाल्या आहेत. या बैठकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत आहे. कार्यकर्ते उत्साहाने काम करीत आहेत. शेतकरी कामगार पक्षाबरोबरच शिवसेना (उध्दव ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. गीतेंसाठी सध्याचे वातावरण अनुकूल आहे. रायगड जिल्ह्यातील मुरूड, अलिबाग, श्रीवर्धनसह अनेक तालुक्यात बैठका झाल्या. वेगवेगळ्या बैठकांमधून कार्यकर्ते, मतदार स्वयंस्फुर्तीने गीतेंना पाठींबा देत असल्याचे दिसून आले आहे.

बॅ. अंतुले यांनी तटकरे यांना राजकीय जन्म दिला. माजी आ. माणिक जगताप, मधूकर ठाकूर यांनीदेखील निवडणुकीत पाठींबा दिला आहे. त्यात शेतकरी कामगार पक्षानेदेखील प्रचंड मेहनत घेऊन मागील लोकसभा निवडणुकीत तटकरेंना निवडून दिले. मात्र ते कोणाचेच राहिले नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत अनंत गीतेंनाच जनतेचा कौल मिळणार आहे, असा विश्‍वास शेकाप अलिबाग तालुका चिटणीस अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version