देशातील प्रादेशिक पक्ष संपूण फक्त भाजपच राहणार

नड्डा यांची दर्पोक्ती

पाटणा, वृत्तसंस्था

देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपूण फक्त भाजपाच राहणार असल्याची दर्पोक्ती भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केली आहे. आहे. आपण जर आपल्या विचारधारेवर चालत राहिला तर प्रादेशिक पक्ष संपतील असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या हस्ते बिहारमध्ये भाजपाच्या 14 जिल्हा कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना संपत आलेला पक्ष असल्याचाही उल्लेख केला.

जे पी नड्डा यांनी यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससोबत लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता पक्ष, समाजवादी पक्ष, बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती अशा अनेक पक्षांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, तामिळनाडूत घराणेशाही, शिवसेना जो संपत आलेला पक्ष आहे, तिथेही हेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही घराणेशाही आहे. काँग्रेस तर आता भाऊ-बहिणीचा पक्ष झाला आहे.अशी टीकाही त्यांनी केली.

आपल्या विचारधारेमुळे सर्व राज्यांमध्ये कमळ फुलेल असा विश्‍वास जे पी नड्डा यांनी व्यक्त केला आहे. या विचारधारेमुळेच जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आल्याचं ते म्हणाले. काँग्रेसने कितीही प्रशिक्षण केंद्रं घेतली तरी त्यांना फायदा होणार नाही. टिकण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षित कार्यकर्त्यांची गरज लागते. दोन दिवसात पक्षाचे संस्कार आत्मसात होत नाहीत, असा टोला जे पी नड्डा यांनी लगावला.

ठाकरेंचे आव्हान

महाराष्ट्रात शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे, असे सांगणार्‍या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करूनच पाहावा, असं थेट आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. ते सोमवारी (1 ऑगस्ट) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले नड्डा यांचं भाषण ऐकलं. त्यात ते म्हणत आहेत की लोकं 20-30 वर्षे इतर पक्षात काम करून भाजपात येतात. म्हणजे इथं यांचं कर्तुत्व शून्य आहे. आता यांच्याकडे काहीच आचार-विचार नाही. भाजपात लढणारा इतर कोणताच पक्ष राष्ट्रीय स्तरावर नाही. इतर पक्ष संपले, जे संपले नाहीत ते इतर सर्व पक्ष संपतील आणि केवळ भाजपाच टिकणार असंही नड्डा म्हणाले. त्यांचं हे वक्तव्य देशाला हुकुमशाहीकडे नेणारं वक्तव्य असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.

राष्ट्रवादी कुंटुंबाचा पक्ष, काँग्रेस भाऊ-बहिणीचा पक्ष असून भाजपाला वंशवादाविरोधात लढायचं असं ते म्हणतात, पण भाजपाचा वंश कोठून सुरू झाला हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. कारण तेच म्हणतात काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षांमधील अनेक नेते भाजपात येत आहेत. इतर पक्षातील लोक त्यांच्याकडे येणार असतील तर मग भाजपाचा वंश नेमका कोणता? असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला केला.

जेपी नड्डा असे कोठेही म्हणालेले नाहीत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना राहिलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवी शिवसेना झाली आहे, असे नड्डा म्हणालेत. ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेवर ते बोलले आहेत.

– देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री
Exit mobile version