7 नंबर जर्सीचा वारसदार फक्त धोनीच!

बीसीसीआयचा मोठा निर्णय; खेळाडूंना दिली सूचना

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची नंबर 7 जर्सी यापुढे इतर कोणत्याही भारतीय खेळाडूला उपलब्ध होणार नाही. धोनीच्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतर सुमारे तीन वर्षांनी बीसीसीआयने हा निर्णय घेतला. धोनीने त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत त्याच्या टी-शर्टवर घातलेला नंबर निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. धोनीचा जर्सी क्रमांक 7 आता निवृत्त होत आहे. बीसीसीआयने खेळाडूंना त्यांचा जर्सी क्रमांक निवडताना तो 7 निवडू नये अशी सूचना केली आहे. बीसीसीआयने हा निर्णय धोनीने भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्याच्या सन्मानार्थ हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

भारतीय क्रिकेट बोर्डाने सचिन तेंडुलकरचा जर्सी क्रमांक 10 हादेखील यापूर्वीच निवृत्त केला आहे. आता धोनीचा जर्सी क्रमांक 7 देखील निवृत्त करून धोनीच्या एकमेवाद्वितीयत्वावर शिक्कमोर्तब केलं.
बीसीसीआय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘सध्याच्या घडीला भारतीय संघातील खेळाडू जवळपास 60 क्रमांक वापरत आहे. जरी एखादा खेळाडू वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ संघाबाहेर असला तरी त्याचा जर्सी क्रमांक दुसऱ्या नव्या खेळाडूला दिला जात नाही. त्यामुळे नव्या खेळाडूंना फक्त 30 क्रमांकातूनच नंबर निवडायचा असतो.’

रोहित-विराटचा नंबर किती?
सध्याच्या भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली 18 क्रमांकाचा टी-शर्ट घालतो आणि रोहित शर्मा 45 क्रमांकाचा टी-शर्ट घालतो. जो सध्या क्रिकेट चाहत्यांमध्ये सर्वात लोकप्रिय टी-शर्ट नंबर आहे.

शार्दुलच्या जर्सीवरुन वाद
2017मध्ये मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने 10 नंबर परिधान करून मैदानात प्रवेश केला होता. यानंतर चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले. काही चाहत्यांनी असेही सांगितले की, शार्दुल सचिन बनण्याचा प्रयत्न करत आहे. यावर रोहितने शार्दुलची खिल्लीही उडवली होती. यानंतर बीसीसीआयने हस्तक्षेप केल्यानंतर ठाकूर यांनी 54 नंबरचा टी-शर्ट परिधान केला.

10, 7 क्रमांचा क्रेझ
जर्सी क्रमांक 10 आणि जर्सी क्रमांक 7 याबाबत फुटबॉलपाठोपाठ क्रिकेटमध्येदेखील मोठी क्रेज पहायला मिळते. फुटबॉलमध्ये सध्या खेळत असलेल्या लिओनेल मेस्सीचा जर्सी क्रमांक हा 10 आहे, तर ख्रिस्तियानो रोनाल्डोचा जर्सी क्रमांक हा 7 आहे. यापूर्वी झिदान, ब्राझीलचा रोनाल्डिन्हो यांनीदेखील जर्सी क्रमांक 10 होता. इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू डेव्हिड बेकहमचादेखील जर्सी क्रमांक हा 7 होता. त्यानेच या जर्सी क्रमांकाला ग्लॅमर मिळवून दिलं होतं.

Exit mobile version