अलिबाग तालुक्यात शेकापचीच सरशी

सर्वपक्षीय विरोधक तोंडघशी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीत अलिबाग तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाविरोधात सर्व पक्ष एकत्र येत मोठमोठया वल्गना करीत असतानाच लागलेल्या अपेक्षित निकालाने सर्वच विरोधक तोंडावर आपटल्याने तालुक्यात हशा झाला आहे. बामणगाव आणि ताडवागळे या ग्रामपंचायतीत शेकापक्षाचे दोन्ही उमेदवार चांगल्या फरकाने विजयी झाले असून विरोधक उमेदवार चारी मुंडया चित झाले आहेत.
कोरोनामुळे लांबणीवर पडलेली ग्रामपंचायतीमधील रिक्त सदस्यपदांची पोटनिवडणूक 21 डिसेंबर रोजी पार पडली. यात अलिबाग तालुक्यातील 8 ग्रामपंचायतीमधील रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. त्यात आवास, काविर, कुरकुंडी, झिराड, बेलकडे, रेवदंडा, बामणगाव, ताडवागळे या ग्रामपंचायतीपैकी काविर, कुरकोंडी, झिराड, बेलकडे व रेवदंडा येथील प्रत्येकी एक जागेवर शेकापच्या उमेदवारांची तर आवासमध्ये एक व रेवदंड्यात 3 विरोधकांची बिनविरोध निवड झाली. मात्र बामणगाव आणि ताडवागळे या दोन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूसाठी मतदान घेण्यात आले. विरोधकांनी प्रतिष्ठेच्या बनवलेल्या या निवडणूकीत शेकापक्षाविरोधात सर्व पक्ष एकत्र आले होते. त्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून गेले होते. शेकाप उमेदवारांच्या पराभवाची दिवा स्वप्ने पाहणारे विरोधक मतदानावेळी ठाण मांडून बसले होते. मात्र मतदारांचा शेकापक्षाच्या विकासकामांवर विजय असल्याने विरोधकांना धुप न घालता शेकापक्षाच्याच उमेदवारांना मतदारांनी कौल दिला. बामणगाव ग्रामपंचायतीच्या वढाव प्रभागातून शेकापक्षाचे उमेदवार लंकेश नागावकर यांचा 150 मतांनी तर ताडवागळे ग्रामपंचायत पोटनिवडणूकित नावजी शिंद यांचा 30 मतांनी विजय झाला. विजयी उमेदवारांचे शेकापक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील, जिल्हा चिटणीस अ‍ॅड आस्वाद पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, तालुका चिटणीस अनिल पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. यावेळी विजयी उमेदवारांची गुलाल उधळीत मिरवणूक काढण्यात आली. शेतकरी भवन येथे जोरदार जल्लोष करत विजय साजरा करण्यात आला.

Exit mobile version