गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी यांना विश्वास
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
सर्वसामान्यांच्या प्रयत्नांतूनच वसुंधरा प्रदूषणमुक्त होईल, असा विश्वास मुरुड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तथा मिठेखार आणि वळके ग्रामपंचायतीचे विद्यमान प्रशासक सुनील गवळी यांनी व्यक्त केला. मुरूड तालुक्यातील वळके आणि मिठेखार ग्रामपंचायत हद्दीत शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची अंमलबजावणी मोठ्या उत्साहाने सुरु आहे. यावेळी ग्रामपंचायतीच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी मार्गदर्शन केले. या उपक्रमास तीनशेहून अधिक महिला आणि पुरुषांनी स्वेच्छेने या स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला.
यावेळी ‘स्वच्छ ग्रामपंचायत अंतर्गत गावातील समाजमंदिर, देवळे, रस्ते, सार्वजनिक स्वच्छतागृहे, घरे आणि घराशेजारील परिसर, पाणवठे, शालेय परिसर या सर्व ठिकाणांची बारकाईने साफसफाई केली. काही तासांच्या अवधीतच हा सारा लख्ख परिसर सगळ्यांच्या दृष्टीस पडला. एवढ्यावरच न थांबता, स्वच्छता ही निरंतर प्रक्रिया असल्याचे मान्य करुन अस्वच्छता होणार नाही, यादृष्टीने कचऱ्याचे व्यवस्थापन, सांडपाण्याचा योग्य निचरा, पाण्याचा पुनर्वापर, कापडी पिशव्यांचा वापर, प्लास्टिक हटाव मोहीम, स्वच्छतेच्या सवयी, स्वच्छतागृहांचा वापर या आणि अशा विविध बाबींची अंमलबजावणी करण्याची उपस्थितांनी सामूहिक प्रतिज्ञा केली. या गोष्टीने भारावून गेल्याने उपक्रमाचे सातत्य टिकवण्यासाठी येत्या 26 जानेवारी या प्रजासत्ताकदिनी महिला मंडळांस 2100 रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. या कार्यक्रमास ग्रामसेवक अमोल पाटील उपस्थित होते.
निपुण भारत अंतर्गत ‘मातामेळावा’सारख्या कार्यक्रमातही शेकडो महिला रमल्याचे सुंदर चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले. या महिलांचे काम नक्कीच कौतुकास्पद आणि इतरांसाठी प्रेरणादायी असल्याने उपस्थित माताभगिनींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास सुनील गवळी यांच्यासह ग्रामसेवक अमोल पाटील आणि वळके ग्रामपंचायत हद्दीतील तीनशेहून अधिक माताभगिनी उपस्थित होत्या.