माथेरानमधील सातपैकी तीनच ई-रिक्षा सुरू

| कर्जत | प्रतिनिधी |

माथेरानमधील सातपैकी तीनच ई-रिक्षा सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सनियंत्रण समितीने ई-रिक्षांची संख्या वाढवावी, अशी मागणी सुहासिनी शिंदे यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दि. 26 डिसेंबरपासून नगरपालिकेने पुन्हा सात ई-रिक्षांसोबत वाहतूक सुरू केली. मात्र, महिन्याभरापासून ई-रिक्षांमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने ई-रिक्षाची सेवाच कोलमडून गेली आहे. अवघ्या तीन ई-रिक्षा सुरू असल्याने स्थानिक रहिवासी, विद्यार्थी व पर्यटक यांना तासन तास ई-रिक्षासाठी वाट पाहावी लागत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने हातरिक्षा चालकांनाच ई-रिक्षा द्याव्यात असा स्पष्ट आदेश दि. 10 जानेवारी रोजी दिला. याची अंमलबजावणीची जबाबदारी सनियंत्रण समितीकडे दिली आहे. असे असतानादेखील ठेकेदारच ई-रिक्षा चालवीत आहे, दि 10 जानेवारी रोजी आदेश प्राप्त होताच तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. म्हसे यांनी ई-रिक्षाची संख्या व मार्ग निश्‍चित करण्यासाठी पाच सदस्यीय कमिटी गठीत केली होती. या कमिटीने आठ हजार रहिवासी, विकेंडला येणारे चार ते पाच पर्यटक व 350 विद्यार्थी यांची गरज लक्षात घेता चाळीस ई-रिक्षांची सुरुवातीला परवानगी देण्याचा प्रस्ताव मांडला होता; परंतु सनियंत्रण समितीच्या काही सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतल्याने सुरुवातीला 20 ई-रिक्षा हात रिक्षाचालकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयाचीदेखील सनियंत्रण समिती अंमलबजावणी करीत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


शंभर वर्षांनंतर ई-रिक्षासारखी सुरू झालेली सेवा स्वस्त व अत्यंत सोयीची आहे. ई-रिक्षाची संख्या वाढवावी व चोवीस तास सेवा देण्यात यावी.

सुहासिनी दाभेकर, सामाजिक कार्यकर्त्या


माथेरानमधील रस्ते खराब आहेत, पेव्हर ब्लॉकला मान्यता दिली तर रस्ते चांगले होतील आणि रिक्षा सुरळीत सुरू राहतील.

सुनील शिंदे
Exit mobile version