पनवेल । वार्ताहर ।
ढाब्यांवर मद्यपान करण्यास मनाई असताना देखील पनवेल परिसरातील ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात मद्यपान केले जात आहे. विशेष म्हणजे ढाबा चालकच मद्य पुरवठा करताना दिसत आहेत. तर काही ढाब्यांवर मद्य विक्री सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा प्रकारे बेकायदेशिर धंदे करणारया विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पनवेल परिसरात सुरू असलेल्या बेकायदशीर धंद्यांवर कारवाई केली नाही तर मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा ईशारा पनवेल बार असोसिएशनने दिला आहे.
पनवेल परिसरातील ढाब्यांवर मद्यपान करुन मद्यपी खुलेआम धिंगाणा घालत आहेत. परिसरातील सुकापूर, नवीन पनवेल, शिरढोण,पळस्पे, आदि ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढाबे आहेत. येथील ढाब्यांवर मद्यपान केले जात असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मद्यपींची जत्रा भरते. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी गस्त घालावी व अशा हॉटेल व बारचालकांवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
परिसरातील ढाब्यांवर सर्रास दारूविक्री देखील सुरू असल्याचे समोर आले आहे. पनवेल पेण हायवे रोडवर असलेल्या ढाब्यांवर अवैधरित्या विनापरवाना देशी-विदेशी दारू विक्री होत असल्याचे समोर आले आहे. शिरढोण, पळस्पे, खारपाडा, सांगुर्ली, कल्हे, तारा, चिंचवण, तूरमाळे येथे ढाबे संस्कृती रुळली आहे. येथील ढाब्यांवर तळीरामांना हवी तेव्हा दारू मिळत असल्याचे समोर आले आहे. मात्र ढाब्यांवर कारवाई करण्यास उत्पादन शुल्क विभाग उदासीन आहे.