आवासमध्ये कांदळवनाची खुलेआम कत्तल

महसूल विभागासह कांदळवन विभागाचे दुर्लक्ष

। अलिबाग । प्रतिनिधी ।

हवामान बदलाचा सामना करण्याबरोबरच माशांच्या अनेक प्रजातींच्या प्रजननासाठी कांदळवन महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे कांदळवन संरक्षणासाठी शासनाकडून पावले उचलण्यात आली आहेत. मात्र, अलिबाग तालुक्यात अनेक भागात कांदळवनांची कत्तल होत आहे. त्यामध्ये आवास खाडीकिनारी धनदांडग्यांकडून खुलेआमपणे कांदळवनांची कत्तल करण्यात आली आहे. मात्र, याकडे महसूल विभागासह वन विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र कवळे यांनी केला आहे.

अलिबाग पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत असताना, मांडवा बंदराच्या विकासानंतर आवास, मांडवा, किहीम या परिसराला अधिकच महत्त्व निर्माण झाले आहे. पर्यटनवाढीलादेखील या परिसरात चालना मिळू लागली आहे. वेगवेगळे सेलिब्रिटी या परिसरात जागा विकत घेऊन बंगले बांधत आहे. परंतु, काही धनदांडग्यांनी विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या मदतीने या परिसरातील नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट करण्याचा घाट घातला असल्याचा प्रकार समोर आला आहे.

आवास या ठिकाणी मोठमोठ्या धनदांडग्यांनी जागा घेऊन बंगले, फार्महाऊस बांधले आहेत. त्याच परिसरातील पर्यावरणाचा र्‍हास करून बंगले उभारण्याचा प्रयत्न धनदांडग्यांनी सुरु केले आहे, असा आरोप मच्छींद्र कवळे यांनी केला आहे. आवास परिसरातील टेकाळी गट नंबर 191/1 जवळ मोठ्या प्रमाणात कांदळवनांची कत्तल करण्यात आली आहे. या कांदळवनाच्या कत्तलीमुळे भरतीच्या पाण्याचा वेग रोखण्यास अडथळा निर्माण होण्याची भीती आहे. आवाससह परिसरातील अनेक गावांतील मच्छिमार मासेमारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु, कांदळवनाच्या तोडीमुळे माशांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे मच्छिमारांवर आर्थिक संकट येण्याची चिंता कवळे यांनी व्यक्त केली आहे. काही धनदांडग्यांकडून कांदळवनांची कत्तल होत असताना त्यांच्यावर स्थानिक प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही. या कांदळवन कत्तलीविरोधात कवळे यांनी आवाज उठविला असून, जिल्हाधिकार्‍यांसह कांदळवन विभागाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी, सांगितले. यावर ठोस कारवाई झाली नाही, तर आठ दिवसात तीव्र लढा पुकारला जाईल असा इशारा त्यांनी ‘कृषीवल’शी बोलताना दिला आहे.

कांदळवनाच्या संरक्षणासाठी यंत्रणा तयार केली आहे. स्थानिक पातळीसह तालुका जिल्हा पातळीर समितीदेखील गठीत केली आहे. कांदळवन करणार्‍यांविरोधात कठोर कारवाई केली जाते. कांदळवनांची कत्तल करणार्‍यांविरोधात तक्रार आल्यास तातडीने त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल.

समीर शिंदे,
वनपरिक्षेत्र अधिकारी,
कांदळवन संरक्षक विभाग
Exit mobile version