I उरण I वार्ताहर I
उरण-पनवेल राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खारफुटीची खुलेआम कत्तल करून त्याठिकाणी अनधिकृत पार्किंग उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये अनधिकृतपणे अनेक गैरधंदे सुरू असतानाही शासकीय यंत्रणेला हे दिसत नसल्याबद्दल त्यांनी गांधारीसारखी डोळ्यावर पट्टी बांधली असल्याची चर्चा जनतेत सुरू आहे. काहींनी तर शासकीय जागेवर कब्जा करून अनधिकृत कंटेनर यार्ड उभारून लाखो रुपयांचे भाडे वसुली करीत आहेत. याबाबत सामाजिक संघटना शासकीय यंत्रणेकडे लेखी तक्रार करून कारवाईची मागणी करणार आहेत.
उरण-पनवेल राष्ट्रीय महामार्गावरील धुतुम परिसरात अनधिकृत पार्किंगचा सुळसुळाट झाला आहे. सदर पार्किंग या शासकीय जागेवरील खारफुटी नष्ट करून सुरू आहेत. खारफुटीची कत्तल केल्याची कुणी तक्रार करण्याची वाट प्रशासन बघत असल्याचे परिस्थितीवरून दिसत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात खारफुटीची कत्तल होत असताना तलाठी, मंडळ अधिकारी, त्याचप्रमाणे सिडको प्रशासनही याकडे डोळेझाक करीत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
उरणमधील धुतुम गावाजवळून मुख्य हायवे रस्ता जात आहे. या रस्त्यावरून अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असते. तसेच कंपनी व गोदामे ही आहेत. परंतु, या ठिकाणी अवजड वाहने उभी करण्यासाठी अधिकृत पार्किंगची व्यवस्था नाही. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात शासकीय जागा मोकळ्या आहेत. त्यामध्ये सिडको प्रशासनाच्या जागा अधिक आहेत. या जागा मुख्य हायवेनजीक असल्याने मोकळ्या जागेवर असलेली खारफुटी खुलेआम तोडून त्याठिकाणी मातीचा भराव करून शेड उभ्या केल्या आहेत. त्यामध्ये गॅरेज, हॉटेल याचबरोबर बेकायदेशीर दारू व इतर नशीली पदार्थांची विक्री टपर्यांमधून केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अशा प्रकारे धुतुम परिसरात सिडकोच्या व इतर शासकीय जागेवर खारफुटीची आजही खुलेआम कत्तल करून अनधिकृत पार्किंगचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. या अनधिकृत पार्किंगच्या माध्यमातून दिवसाला हजारो रुपयांची कमाई पार्किंग चालविणार्याला मिळत आहे. त्यातील ठराविक मलिदा शासकीय अधिकारी वर्गाला दिला जात असल्याची चर्चा असून, त्यामुळेच कारवाई होत नाही, अशी चर्चा या परिसरात सुरू आहे.