Waste Management: मोकळी जागा ठरतेय कचऱ्याचे अड्डे

गावे, वाड्यांमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात; ग्रामीण भागात कचऱ्याच्या समस्येने नागरिक त्रस्त

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

कचरा व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. मात्र, हे प्रयत्न पूर्णतः फेल ठरल्याचे चित्र समोर आले आहे. पंधरा वित्त आयोगासह वेगवेगळ्या निधीतून घंटा गाडी खरेदी करण्यात आल्या. परंतु, आजही जिल्ह्यातील गावे, वाड्यांच्या प्रवेशद्वारासमोर ठिकठिकाणी कचरा अस्तव्यस्त पडलेला आहे. ग्रामीण भागात कचऱ्याच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या कडेला, मैदानावर व मोकळ्या जागेतील कचऱ्यामुळे रोगराई पसरून साथीचे रोग उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

2011 च्या जनगणनेनुसार रायगड जिल्ह्याची लोकसंख्या 26 लाख34 हजार 200 आहे. त्यामध्ये 13 लाख 44 हजार 345 पुरुष आणि 12 लाख 89 हजार 855 महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख 64 हजार पाच इतकी आहे. त्यामध्ये आठ लाख 36 हजार 996 पुरुष व आठ लाख 27 हजार नऊ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना जिल्हा परिषदेच्या मार्फत राबविल्या जातात. जिल्ह्यामध्ये औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. दोन हजारांहून अधिक लहान-मोठे प्रकल्प आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकीकरणही झपाट्याने वाढत आहे. ग्रामपंचायतींवर लोकवस्तीचा भार वाढत आहे. नागरिकांचे आरोग्य राखण्याबरोबरच त्यांना स्वच्छतेची सवय राहावी, यासाठी जिल्हा परिषद स्वच्छता व पाणी विभागाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले.

शोष खड्ड्यापासून कंपोस्ट पीट उभारण्याबाबत जनजागृती करण्यात आली. गावांच्या वेशीवर ही कंपोस्ट पीट बांधण्यात आले. जमा केलेल्या कचऱ्याची योग्य रितीने विल्हेवाट लावली जात नसल्याने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. जिल्ह्यातील 810 ग्रामपंचायतींपैकी काही मोजक्याच ग्रामपंचायतींनी पंधरा वित्त आयोग, लोकसहभाग आणि अन्य शासकीय योजनेतून घंटागाडी घेतली आहे. मात्र, या कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नसल्याची बाब समोर आली आहे. रस्त्याच्या दुतर्फा अथवा मोकळ्या जागेत, मैदानामध्ये कचरा टाकण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यवर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यात केवळ 16 ग्रामपंचायतींमध्ये कचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित आहे. अन्य ग्रामपंचायती जागेअभावी हा प्रकल्प उभारण्यास अपयशी ठरले आहेत. बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये डंपिंग ग्राऊंड नाही. त्यामुळे जमा केलेला कचरा रस्त्याच्या किनारी, मैदानाच्या कोपऱ्यात, मोकळ्या जागेत अथवा नदी लगत टाकला जात आहेे. जमा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी, असा प्रश्न ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींनाही भेडसावत आहे.

वायू प्रदूषणाचा धोका
रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा विस्तार वाढत आहे. नागरिकीकरणही झपाट्याने वाढत आहे. मात्र, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणेचा अभाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. जमा केलेला कचरा जाळून टाकण्यावर अनेकजण भर देतात. त्यामुळे वायू प्रदूषणाचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कचऱ्याच्या धुरामुळे नागरिकांमध्ये दम्याचे व इतर आजार वाढण्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जमा झालेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळेही साथीचे आजार फैलावण्याचा धोका असल्याचे बोलले जात आहे.
Exit mobile version