ईद का चाँद दिखतेही ऑपरेशन ॲन्टी लोटस शुरु ?

अल्पसंख्याक समाजाकडून तटकरेंच्या करेक्ट कार्यक्रमाची तयारी

। रायगड । आविष्कार देसाई ।

भाजपाच्या मांडीवर बसुन सुनील तटकरे निवडणुक लढवत आहेत. सुनील तटकरेंना मत म्हणजे भाजपाला मत हे आता अल्पसंख्याक समाजासह संविधान वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या सर्वच राजकीय पक्ष, विविध समाजातील घटकांनी हेरले आहे. इधर ईद का जाँद दिखा, उधर ऑपरेशन ॲन्टी लोटस शुरु…. अशा आशयाचे मेसेज समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत.

जिल्ह्यातील मुस्लीम समाज हा तटकरेंच्या कार्यप्रणालीवर नाराज आहे. खासदार असताना तटकरेंनी समाजासाठी विशेष असे काहीच केले नाही. याबाबत समाजातील नेत्यांनी उद्धव ठाकरे, अनंत गीते यांच्याकडे नाराजी बोलून दाखवली आहे. तसेच, विविध प्रचार सभेत हे प्रश्न विशेष अधोरेखित झाले आहेत. आता तर तटकरे हे भाजपाच्या मांडीवर बसले असल्याने ते आपले प्रश्न कसे सोडवतील, असा सवाल अल्पसंख्याक समाजाच्या मनात असल्याचे बोलले जाते. देशाचे संविधान बदलण्याची भाषा भाजपाचे नेते जाहिररित्या बोलत असल्याने दलित समाज कमालीचा नाराज झाल्याचे चित्र आहे. इंडिया आघाडीने संविधान वाचवण्यासाठी लढाई उभी केली आहे. त्यांच्या या लढाईत समविचारी पक्ष, सामाजिक संघटना, संस्था जोडल्या जात आहेत. मराठा आरक्षणावरुन मराठा आणि ओबीसी समाजात सरकार विरोधात उघड नाराजी असल्याचे लपलेले नाही. त्यामुळे भाजपाच्या नाराजीचा फटका हा तटकरेंना बसणार असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या अनंग गीते यांना तटकरेंच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. इंडिया आघाडीच संविधान वाचवून देशाला तारु शकेल, असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण करण्यात येत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी बोलून दाखवला. त्यांच्यासभा देखील मतदारसंघात पार पडत आहेत. त्यामध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. देशाच्या जडणघडणीत मुस्लिम समाजाचे योगदान आहे हे कोणीच नाकारु शकत नाही. मात्र भाजपाचा अजेंडा हा अल्पसंख्याक विरोधी आहे. तटकरे हे आता भाजपाच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. त्यामुळे तटकरेंना मत म्हणजे भाजपाला (मोदींना) मत जाणार आहे. याला आता आम्ही आधीपासूनच विरोध सुरु केला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष आमिर खानजादा यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले.

जिल्ह्यातील मुस्लीम, दलित, मराठा, ओबीसी, कष्टकरी, कामगार, महिला, युवा यांना याबाबत जागरुक करण्यात येत असून प्रत्येक मोहल्लयात, वाडी-वस्त्यांवर, चौकात, नाक्यांवर, घरात बैठका घेण्यात येणार आहेत. संविधान वाचवण्याच्या लढाईत आपण इंडिया आघाडीच्या म्हणजे अनंत गीते यांच्यासोबत राहायचे आहे, असा प्रचार करण्यात येणार असल्याचे खानजादा यांनी स्पष्ट केले.

इधर ईद का जाँद दिखा, उधर ऑपरेशन लोटस शुरु होगा, लडाई अब आर पार की है, संविधान बचाने की है, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टी, शिवसेना (उबाठा), काँग्रेस पार्टी अब फॅसिस्ट ताकदों को रायगड से उखाड फेकेंगी, तटकरे को वोट मतलब फॅसिस्ट भाजपा को वोट, असे मेसेज व्हॉटस ॲपच्या फ्रिडम ऑफ स्पीच या ग्रुपवर व्हायरल होऊ लागले आहेत.
Exit mobile version