स्थानिकांच्या मदतीने पडलेले झाड हटविले
। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे-रोहा मार्गावरील भिसे खिंडीतील वळणदार रस्त्यावर मधोमध कोसळलेले झाड स्थानिक नागरिकांच्या मदतीने हटविण्याचे काम नागोठणे पोलिसांनी केले आहे. नागोठणे पोलिस ठाण्यातील वाहतूक शाखेने दाखविलेल्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नागोठणे – रोहा मार्गावर नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दितील भिसे खिंडीत एका नागमोड्या वळणावर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एक महाकाय वृक्ष कोसळल्याची माहिती नागोठणे पोलिस ठाण्याला मिळाली. त्यानुसार नागोठणे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक हरेष काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रपाळीत कर्तव्यावर असलेल्या नागोठणे पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्त्यावर पडलेल्या झाडाच्या फांद्या तोडून ते झाड रस्त्याच्या बाजूला करण्यात आले. नंतर सकाळी साधारण 6.20 वाजण्याच्या सुमारास नागोठणे रोहा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला. त्यामुळे सकाळी नागोठणे व रोहाकडे जाणार्या वाहनचालकांना कोणताही त्रास झाला नाही.