पक्के विरोधक एकाच व्यासपीठावर

। बारामती । प्रतिनिधी ।

इंदापूर तालुक्यात ज्यांच्यातून विस्तवही जात नाही असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे आज महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत व्यासपीठावर एकत्र आले.

इंदापूरच्या राजकारणात हर्षवर्धन पाटील यांची अजित पवार यांनी आजवर कायम कोंडी केली. हे दोघेही एकेकाळी आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. परंतु, जिल्ह्याचे पालकमंत्री पद आपल्याकडे ठेवत अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांची कायम कोंडी केली. जिल्हा बँकेच्या माध्यमातूनही त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. पाटील यांचे राजकारण संपविण्याचा विडाच अजित पवार यांनी उचलला होता. परिणामी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीच अनेकदा गोची झाली. कारण शरद पवार यांना कन्या सुप्रिया यांच्यासाठी पाटील यांची लोकसभेला मदत घ्यावी लागत होती. त्याही स्थितीत अजित पवार यांनी हर्षवर्धन यांची कोंडी करण्याची एकही संधी सोडली नव्हती.

दुसरीकडे अजित पवार यांचे समर्थक दत्तात्रय भरणे यांना पदे देत ताकद देण्यात आली. छत्रपती कारखान्याचे चेअरमन, जिल्हा बँकेचे चेअरमन करत पुढे त्यांना विधानसभेला उतरविण्यात आले. त्यातून पाटील यांचे राजकारण जवळपास संपविण्यात आले. सततेच्या या पवार विरोधामुळे अखेर हर्षवर्धन हे भाजपामध्ये दाखल झाले. त्यांचे बरे चालले असतानाच महायुतीत अजित पवार सहभागी झाले. त्यामुळे हर्षवर्धन यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला. सुरुवातीला पाटील यांनी आढेवेढे घेतले. पण, आता ते सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. आज ते अजित पवार आणि भरणे यांच्यासह व्यासपीठावर असल्याचे दिसले.

Exit mobile version