नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
काँग्रेसच्या १०० आमदारांसह तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी आणि इतर अनेक प्रादेशिक पक्षांचे नेते राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या बैठकीत उपस्थित होते. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असून यावेळी सरकारला कोडींत पकडण्यासाठी विरोधकांकडून व्यूहरचना आखली जात आहे. पेगॅसस प्रकरणावरुन संसदेत गदारोळ घालत सरकारला जाब विचारणारे विरोधक एकवटले असून यावेळी पुढील रणनीती आखण्यात आली असं बोललं जात आहे.
एकीकडे पेगॅसस प्रकरणामुळे गदारोळ सुरु असताना आसाम-मिझोराम सीमेवर रक्तरंजित संघर्षावरुनही विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेसने विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेत ब्रेकफास्ट मीटचं आयोजन केलं होतं. विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या बैठकीदरम्यान राहुल गांधी म्हणाले, माझ्या दृष्टीकोनातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एक असणं आणि हीच आपली ताकद आहे. जेवढे लोक एकत्र आवाज उठवतील तेवढा हा आवाज बुलंद होईल आणि तो दाबून टाकणं भाजपा-संघासाठी आणखी अवघड होईल.