भारतीय संघात नव्या चेहऱ्यांनाही संधी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आयपीएल स्पर्धा संपल्यानतर जूनमध्ये होत असलेल्या अफगाणिस्तानविरुद्धचा एकमेव कसोटी सामना आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघांची निवड मंगळवारी (दि.19) जाहीर करण्यात आली. यावेळी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली. त्यात मानव सुतार, हर्ष दुबे, गुरनुर ब्रार आणि प्रिन्स यादव यांचा समावेश आहे. परंतु, यावेळी रिषभ पंतला दुहेरी धक्का बसला. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी संघात स्थान तर राखले, परंतु उपकर्णधारपद गमावले. त्याचबरोबर एकदिवसीय संघातूनही त्याला दूर करण्यात आले. तसेच, एकदिवसीय संघात यष्टीरक्षक म्हणून के.एल. राहुलला पहिली पसंती मिळत असली तरी पंत संघात कायम होता. आता मात्र त्याचे कसोटीतील उपकर्णधारपद गेले आणि एकदिवसीय संघातूनही दूर करण्यात आले. त्याच्याऐवजी दुसरा यष्टीरक्षक म्हणून ईशान किशनची निवड करण्यात आली. याशिवाय 370 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या रवींद्र जडेजालाही दोन्ही संघांत स्थान मिळालेले नाही. दरम्यान, जडेजा तसेच अक्षर पटेल संघात नसल्यामुळे आता हर्ष दुबे आणि मानव सुतार या फिरकीपटूंना भारताकडून पदार्पणाची संधी मिळू शकते. या निर्णयाबाबत संघनिवड जाहीर करताना निवड समिती अध्यक्ष अजित आगकरांनी स्पष्ट कारणं दिली आहेत.

Exit mobile version